मुंबई : 2019 मध्ये होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लक्षात घेता विराट कोहलीसह अन्य खेळाडूंना काही सामन्यांत विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्वचषक स्पर्धेत भारताच्या प्रमुख खेळाडूंना तंदुरूस्तीचा प्रश्न उद्भवू नये याकरिता या निर्णय घेतल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
''विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असावेत अशी व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यामुळे विराटला त्या स्पर्धेपर्यंत आणखी विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच रोटेशन पॉलीसीनुसार विश्वचषक स्पर्धेत सर्वोत्तम संघ उतरवण्याचा आमचा प्रयत्न आहे,'' असे BCCI च्या सुत्रांनी सांगितले.
विराटला आशिया चषक 2018 स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने संघाची धुरा सांभाळली होती आणि संघाला जेतेपदही जिंकून दिले होते. विराटला याआधी निदाहास चषक स्पर्धेतही विश्रांती देण्यात आली होती. दुखापतीमुळे त्याला कौंटी क्रिकेट स्पर्धेलाही मुकावे लागले होते.
विराटसह भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनाही पुरेशी विश्रांती दिली जाऊ शकते. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांचा समावेश नाही. भुवनेश्वरला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळता आली नव्हती, तर बुमरालाही पहिल्या दोन सामन्यात खेळता आले नाही.