नवी दिल्ली : भारतीय संध सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. शनिवारी वन डे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला ज्यात भारताने बाजी मारली. मात्र मालिकेतील सलामीचे दोन सामने जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. खरं तर भारताने मालिका गमावली असली तर शनिवारी झालेला अखरेचा सामना अविस्मरणीय केला. संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने द्विशतक ठोकून इतिहास रचला. तर किंग कोहलीने आपल्या कारकिर्दीतील ७२वे शतक झळकावले. जवळपास १२०० दिवसांनंतर विराटने वन डे मध्ये शतकी खेळी केली. वन डे मालिकेनंतर भारतीय संघ लोकेश राहुलच्या नेतृत्वात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून खेळवला जाईल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. आगामी मालिकेसाठी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी भारतीय संघाचा हिस्सा नसणार आहेत. तर नवदीप सैनी आणि सौरभ कुमार या युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. भारत अ संघाचा आघाडीचा फलंदाज सौरभ कुमार एका मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे जयदेव उनाडकट हा देखील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे.
रोहित संघाबाहेरभारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला वन डे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. तरीदेखील रोहितने भारताच्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्या सामन्यात रोहितने २९ चेंडूत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मात्र रोहितची झुंज अयशस्वी ठरली आणि यजमान बांगलादेशच्या संघाने सामन्यासह मालिकेवर कब्जा केला. रोहितला दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
भारत विरूद्ध बांगलादेश कसोटी मालिका
- १४-१८ डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- २२-२६ डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"