त्रिनिदाद : सध्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. दरम्यान, या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवले जाणार आहेत. मात्र आता हे दोन्ही सामने देखील वेस्टइंडिजच्याच धरतीवर खेळवले जाण्याची शक्यता आहे. कारण क्रिकेट वेस्टइंडिजला (CWI)व्हिसाच्या समस्येमुळे हा निर्णय घ्यावा लागू शकतो. मालिकेतील दुसरा सामना आज त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे आणि याच ठिकाणी मालिकेतील तिसरा सामना २ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार ६ आणि ७ ऑगस्ट रोजी होणारे मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पार पडतील.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही संघातील खेळाडूंचे अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसाची कागदपत्रे अद्याप आलेले नाहीत. यासाठी क्रिकेट वेस्टइंडिजला एक पर्यायी प्लॅन तयार करावा लागणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार फ्लोरिडातील लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रोवार्ड पार्क मैदानावर शेवटचे दोन सामने होणार आहेत. माहितीनुसार, भारतीय खेळाडू आणि काही वेस्टइंडिजच्या खेळाडूंची अजूनही अमेरिकेला जाण्यासाठी व्हिसाची कागदपत्रे आली नाहीत.
वेस्टइंडिजमध्येच दोन्ही सामने होण्याची शक्यता
वेस्टइंडिज क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "वेस्टइंडिजच्या धरतीवरच शेवटचे दोन सामने खेळवले जाऊ शकतात. मात्र अद्याप व्हिसाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यापूर्वी संघ सेंट किट्समध्ये पोहचल्यावर त्यांना अमेरिकेच्या व्हिसाची कागदपत्रे दिली जायची मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे." दरम्यान ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
Web Title: There has been a visa crisis for the 2 matches of the T20 series between India and West Indies in America
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.