नवी दिल्ली : आज विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. खरं तर यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. आजच्या सामन्यातील विजय कांगारूच्या संघाला उपांत्य फेरीकडे नेऊ शकतो. मात्र त्यांच्या या वाटेत इंग्लिश संघाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण अ गटातून न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची धुरा मॅथ्यू वेडच्या खांद्यावर आहे. नियमित कर्णधार आरोन फिंचला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय मिचेल स्टार्क आणि टिम डेव्हिड यांना देखील विश्रांती देण्यात आली आहे. यांच्या जागी स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन आणि केन रिचर्डसन यांना संघात स्थान मिळाले आहे.
आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, कॅमेरन ग्रीन, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.
उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान न्यूझीलंडला
न्यूझीलंडने आयर्लंडचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. अ गटातून न्यूझीलंडचा संघ 7 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यामुळे अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस होईल. सध्या या दोन्हीही संघाचे 5-5 गुण असून त्यांचा प्रत्येकी 1-1 सामना राहिला आहे. मात्र इंग्लंडचा नेटरनरेट जास्त असल्यामुळे इंग्लिश संघ उपांत्य फेरी गाठेल अशी अपेक्षा आहे. तर ब गटातून भारतीय संघ 6 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत उपांत्य फेरी गाठणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मात्र भारत ब गटातून दुसऱ्या स्थानावर राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना न्यूझीलंडविरूद्ध होईल. याशिवाय भारत जर अव्वल स्थानावरच राहिला तर भारताचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो.
2015 पासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा प्रवास
- - 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे उपविजेते.
- - 2016 टी-20 विश्वचषकाचा उपांत्य फेरीपर्यंत पोहचले.
- - 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे उपविजेते.
- - 2021 टी-20 विश्वचषकाचे उपविजेते.
- - 2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र.