ICC World Cup IND vs PAK 2023 : वर्ल्ड कप २०२३ चे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. भारतीय संघ आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे, तर भारत आणि पाकिस्तानचे संघ १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्यावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीच्या मते, भारत-ऑस्ट्रेलिया सामना भारत-पाकिस्तान सामन्यापेक्षा चांगला आहे.
सौरव गांगुली म्हणतो की, गेली अनेक वर्ष भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी होत असल्याचे जाणवत आहे. भारताने या सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांत दर्जेदार सामने झालेले नाहीत. भारतीय संघ पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत आहे. गेल्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. उभय संघांमधील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला.
सौरव गांगुलीने २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची आठवण करताना म्हटले की, या स्पर्धेत बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. तेव्हा भारतीय संघ खरंच वाईट खेळला होता. २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना दर्जेदार होईल.