मतीन खानस्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह
चेन्नई सुपरकिंग्जने रविवारी ज्याप्रकारे दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी सामन्यात नमवले, त्यावरून हेच स्पष्ट होत आहे की, धोनीने पुन्हा एकदा कर्णधारपद सांभाळल्यापासून संघ केवळ बदललेला नाही, तर या संघात पुन्हा एकदा जुना जोश परतला आहे. इतिहास साक्षीला आहे की, कर्णधारपद सांभाळणे सोपी गोष्ट नाही. कर्णधार केवळ नावापुरता नसतो. विविध जबाबदाऱ्यांचे ओझे त्याला खांद्यावर वाहून न्यायचे असते. मैदानात दबावाच्या आणि निर्णायक क्षणी त्याला मोठे निर्णय घ्यायचे असतात आणि यासोबतच कर्णधाराला आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळाडूंसमोर आदर्शही घालून द्यायचा असतो. यामध्ये कर्णधार म्हणून रवींद्र जडेजा सपशेल अपयशी ठरला.
फलंदाजी आणि गोलंदाजी तर दूरची गोष्ट; पण त्याच्या क्षेत्ररक्षणातही घसरण झाली. धोनीने कशा प्रकारे भारतीय संघाचे नेतृत्व केले, हे आपण पाहिलेच आहे. २००७ साली टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये आयसीसी ५० षटकांचा विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने धोनीच्या नेतृत्वातच जिंकली. त्याच्या यशाचा आलेख आयपीएलमध्येही चढता राहिला आणि त्याने चार वेळा चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले. धोनीसारखा कोणी बनूच शकत नाही; पण याचा अर्थ असा नाही, की त्याच्या कर्णधार म्हणून त्याच्यासाठी पर्याय निर्माण होऊ शकत नाही. संघातील खेळाडूंमध्ये जोश निर्माण करणे, हे कर्णधाराचे काम आहे. कर्णधाराला आपल्या खेळाडूंमध्ये ही भावना निर्माण करावी लागते, की कोणत्याही सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही.
इतिहास आपल्याला सांगतो की, जेव्हा कधी कोणत्या संघाने मोठी स्पर्धा जिंकली आहे, तेव्हा त्या संघाला कर्णधारानेच प्रेरित केले आहे आणि आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर संघाच्या यशामध्ये मोलाचे योगदानही दिले आहे. यासाठी मी उदाहरण देईन ते १९८३ विश्वचषक स्पर्धेतील कर्णधार कपिलदेवने झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेली नाबाद १७५ धावांची खेळी. १९९२ विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या इम्रान खानची शानदार फलंदाजी आणि २०११ च्या विश्वचषक अंतिम फेरीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने स्वत: वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन खेळलेली निर्णायक नाबाद ९१ धावांची विजयी खेळी. धोनीने मारलेला विजयी षटकार क्रिकेटविश्व कधीही विसरू शकणार नाही.
आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे, हे प्रत्येक कर्णधाराचे सर्वांत महत्त्वाचे काम असते. सध्या आयपीएलमध्ये गुजरात संघ आघाडीच्या दोन स्थानांमध्ये आहे. गुजरातचे कर्णधारपद सांभाळताना हार्दिक पांड्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. या जोरावर त्याने आपल्या संघाला चांगली कामगिरी करण्यास बाध्य केले. लखनौचा कर्णधार लोकेश राहुलनेही शानदार कामगिरीसह आपल्या संघाला प्ले ऑफच्या उंबरठ्यावर आणले आहे.कर्णधारपद केवळ एक पद नाही, तर ते आगीचा समुद्र आहे आणि हे पार करूनच चषक जिंकता येईल. जिगर मुरादाबादी यांनी एक शायरी प्रेमिकांसाठी केली आहे; पण ही गोष्ट कर्णधारपदासाठीही तंतोतंत लागू पडते.ये इश्क नही आसान, बस इतना समझ लिजिए,आग का दरिया है और डूब के जाना है!