नवी दिल्ली : श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) या दोन्ही संघाची आशिया चषकातील (Asia Cup 2022) सुरूवात निराशाजक झाली. दोन्हीही संघाना अफगाणिस्तानच्या संघाने त्यांच्या सलामीच्या सामन्यामध्ये मोठ्या फरकाने पराभूत केले. ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या संघाने सलग 2 विजय मिळवून सुपर-4 फेरी गाठली आहे. दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आज शकीब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाशी भिडणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 मध्ये पोहोचेल. त्याचबरोबर पराभूत संघाचा प्रवास पहिल्या फेरीतच संपणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच श्रीलंकेच्या कर्णधाराच्या एका विधानाने वाद चिघळला आहे.
असा सुरू झाला वाद दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आणि बांगलादेशच्या संघाचे संचालक खालिद महमूद यांच्यात आजच्या सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध रंगले आहे. श्रीलंकेने 5 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले असून यंदा ही स्पर्धा श्रीलंकेच्या यजमानपदामध्ये होत आहे. तसेच अफगाणिस्तानकडे वर्ल्ड क्लास गोलंदाजांची फळी आहे. दुसरीकडे बांगलादेशची गोलंदाजी त्यांच्यापेक्षा कमकुवत आहे. मुस्तफिजुर रहमान आणि शकीब हे साहजिकच वर्ल्ड क्लास गोलंदाज आहेत. पण इतर गोलंदाजांना फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या तुलनेत बांगलादेश संघ आम्हाला मोठे आव्हान देईल असे वाटत नाही. असे दासुन शनाकाने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. विशेष म्हणजे श्रीलंकेचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 105 धावा करू शकला होता.
श्रीलंकेच्या संघात एकही चांगला गोलंदाज नाहीदासुन शनाकाला बांगलादेशच्या संघाचे संचालक खालिद महमूद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, "शनाका असे का बोलला हे मला माहीत नाही. मात्र आम्हाला विश्वास आहे की अफगाणिस्तान एक महान संघ आहे. आमच्याकडे दोन प्रमुख गोलंदाज आहेत, पण मला श्रीलंकेत एकही चांगला गोलंदाज दिसत नाही." श्रीलंकेच्या फलंदाजीवरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाला केवळ 127 धावा करता आल्या होत्या.