वेलिंग्टन : भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या फलंदाजांना अती बचावात्मक पवित्रा सोडण्याचे आवाहन करताना म्हटले की, ‘विदेश दौऱ्यात अशा प्रकारच्या खेळाचा कधीच फायदा होत नाही.’ भारताला बेसिन रिझर्व्हमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १० गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर भारताला दोन्ही डावात दोनशेचा पल्ला गाठता आला नाही.
पराभवानंतर कोहली म्हणाला,‘फलंदाजी करताना अतिसावधगिरी बाळगण्याचा लाभ होईल, असे वाटत नाही. अशा स्थितीत तुम्ही नैसर्गिक फटके खेळू शकत नाही.’ दुसºया डावात तंत्राच्या बाबतीत उत्तम फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराने अति बचावात्मक पवित्रा स्वीकारला आणि ८१ चेंडूंत केवळ ११ धावा केल्या. हनुमा विहारीने ७९ चेंडू खेळताना १५ धावा केल्या. भारतीय फलंदाज कधीही फॉर्मात असल्याचे भासत नव्हते.
दरम्यान, पुजाराने २८ चेंडूंमध्ये एकही धाव घेतली नव्हती. त्यामुळे दुसºया टोकावर असलेल्या मयांक अगरवालला आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. कोहली म्हणाला,‘अशा स्थितीत एकही धाव घेतली नाही, तर तुमच्या मनात शंका येते. अशा स्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही केवळ एका चांगल्या चेंडूवर तुमची विकेट जाण्याची प्रतीक्षा करीत असता.’ (वृत्तसंस्था)
‘आक्रमक पवित्रा महत्त्वाचा’
भारतीय कर्णधार विराट कोहली प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यासाठी ओळखला जातो. त्याला संघातील अन्य फलंदाजांकडूनही अशीच अपेक्षा आहे. याविषयी विराट म्हणाला की, ‘मी प्रत्येक सामन्यामधील परिस्थितीची पूर्ण माहिती घेतो. जर खेळपट्टीवर हिरवळ असेल, तर संघाला पुढे नेण्यासाठी मी आक्रमक पवित्रा स्वीकारतो. जर तुम्ही अपयशी ठरलात, तरी तुम्हाला हे स्वीकारावे लागेल की तुमचा विचार योग्य होता. तुम्ही यश मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही. ही गोष्ट स्वीकारणे काही वाईट नाही.’
Web Title: There is no benefit to being cautious - Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.