मुंबई, विश्वचषकासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. पण अजूनही संघाच्या चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज बॅटींगला येणार हे मात्र अद्याप गुलदस्यात आहे. पण भारताचा सलामीवीर शिखर धवनने मात्र हे रहस्य उलगडले आहे.
भारताने गेल्या काही वर्षांमध्ये चौथ्या क्रमांकावर बऱ्याच फलंदाजांना खेळवून पाहिले. पण आतापर्यंत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, याचे ठोस उत्तर चाहत्यांना मिळालेले नाही. काही दिवसांपूर्वी अंबाती रायुडूला चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आणले जात होते. पण विश्वचषकाच्या संघात रायुडूला संधीच देण्यात आलेली नाही.
याबाबत धवन म्हणाला की, " विश्वचषकासाठीचा भारताच संघ चांगलाच समतोल आहे. विश्वचषकाच्या संघातील चौथ्या क्रमांकाबाबत कोणताच संभ्रम नाही. चौथ्या क्रमांकावर विजय शंकर खेळू शकतो किंवा लोकेश राहुललाही संधी देण्यात येऊ शकते. त्यामुळे आमच्यासाठी चौथ्या क्रमांकाचा कोणताही प्रश्न नाही. "
धवन जीएस कॅलटेक्स इंडिया या कंपनीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी धवनची यावेळी निवड करण्यात आली आहे.