गडचिरोली : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. क्रीडा स्पर्धेत शॉर्टकट मार्ग चालत नाही. परिश्रम व शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्याच जोरावरच क्रीडा क्षेत्रात यश मिळविता येते. मात्र खेळादरम्यान चुका दुरूस्तीला संधी नाही. थोड्याशाही चुकीने पराभव पत्करावा लागतो, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांनी केले.
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या मैदानावर अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कॉर्फबॉल (मिक्स) स्पर्धांचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर उपस्थित होते. याशिवाय मंचावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.सी.व्ही.भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डॉ.हंसा तोमर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर क्रीडा स्पर्धांमध्ये देशाच्या २३ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत. क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी सहा संघांचे तीन राऊंड झाले. यामध्ये जयपूर विरूद्ध गोंडवाना विद्यापीठ, कलिकट विरूद्ध जम्मू विद्यापीठ व त्यानंतर कलिकट विरूद्ध आग्रा विद्यापीठाच्या संघात सामने झाले. यात गोंडवाना विद्यापीठ व कलिकट विद्यापीठाने विजय मिळविला.
कुलकर्णींनी मानधन केले परत
अखिल भारतीय आंतरविद्यापीठस्तरीय कॉर्फबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलकर्णी यांना मानधन देण्यात आले. मात्र हे मानधन न स्वीकारता ते कुलकर्णी यांनी विद्यापीठ प्रशासनाला परत केले. ग्रामीण भागाच्या क्रीडा विकासासाठी या निधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केल्याचे शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ.अनिता लोखंडे यांनी सांगितले.
नियोजनाचा अभाव
अखिल भारतीयस्तरावरील ही कॉर्फबॉल स्पर्धा पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात होत आहे. या स्पर्धा आयोजित करण्याचा मान गोंडवाना विद्यापीठाला मिळाला. मात्र उद्घाट कार्यक्रम व त्यानंतर झालेल्या स्पर्धांदरम्यान नियोजनाचा अभाव दिसून आला. सदर स्पर्धा आयोजनाबाबत अधिकारी व कर्मचाºयांमध्ये समन्वय नसल्याने प्रसार माध्यमांना झालेल्या सामन्यांचे निकाल मिळण्यासाठीही ताटकळत राहावे लागले.
Web Title: There is no opportunity to correct mistakes in any sport; Former India's cricketer says
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.