ब्रिसबेन : चुकीचा फटका मारून बाद झाल्यामुळे रोहितवर चौफेर टीका होत आहे. नाथन लियोनच्या चेंडूवर मारलेल्या त्या शॉटचा रोहितला कुठलाही पश्चात्ताप नाही. गोलंदाजांवर दडपण वाढविण्याची माझी ही पद्धत असून यापुढेही असे स्ट्रोक्स खेळतच राहणार असल्याचे मत सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. ७४ चेंडूत ४४ धावा काढणारा रोहित मोठी खेळी करेल, असा अंदाज होता तोच लियोनचा चेंडू मिडविकेटला फटकाविण्याच्या नादात तो झेलबाद झाला. कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो. नाथन लियोन चतुर गोलंदाज असल्याने मला उत्तुंग फटका मारणे कठीण होईल, असा चेंडू शिताफीने टाकला. समालोचकांनीदेखील रोहितवर टीका केली. याविषयी रोहित पुढे म्हणाला, ‘मी अनेकांची निराशा समजू शकतो. असा शॉट मी आधीही खेळलो आहे. संघात माझी भूमिका काय आहे, हे ध्यानात ठेवूनच असे फटके मारतो. माझे बाद होणे दुर्दैवी असले तरी असा फटका कधी सीमारेषेच्या वरून जातो तर कधी क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतो. हा फटका मारणे पुढेही सुरूच राहणार आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- 'त्या' शाॅटचा पश्चात्ताप नाही, असे स्ट्रोक्स खेळत राहणार - रोहित
'त्या' शाॅटचा पश्चात्ताप नाही, असे स्ट्रोक्स खेळत राहणार - रोहित
कसोटी खेळताना सुरुवातीच्या दिवसात रोहित असेच फटके मारून बाद झाला, हे विशेष. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘तुमच्याकडे नेहमी एक योजना असते. मला तो शॉट खेळल्याचा काहीच पश्चात्ताप नाही. मी नेहमी गोलंदाजांवर दडपण आणू इच्छितो.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 3:49 AM