>> अयाज मेमन
बांगलादेशच्या शाकीब उल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. बुकी दीपक अग्रवाल याच्याबाबतची माहिती आयसीसीला न दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. उच्चस्तरीय क्रिकेटमधून भ्रष्टाचाराची कीड अद्यापही पूर्णपणे संपलेली नाही, हे अत्यंत वाईट आहे. खेळाडूंनीच ठरवले तरच खेळ भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो. या कारवाईमुळे शाकिब भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. तो भारताविरोधात बांगलादेशकडून परिणामकारक ठरू शकला असता. तो कर्णधाराबरोबरच संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे.
शाकीब नसल्यामुळे त्याच्याप्रमाणेच अन्य खेळाडूंना आक्रमक खेळ करावा लागेल. शाकीबवरील आरोप हे सामनानिश्चिती किंवा स्पॉट फिक्सिंगचे नाहीत. तर, दीपक अग्रवाल याने आपल्याशी संपर्क साधल्याची माहिती न दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या दोन्ही बाबी खूप वेगळ्या आहेत. मला वाटते की शाकीब याने त्याला फारसे महत्त्व दिले नसावे. तो गुन्हेगार नाही. साधारणत: एक दशकापासून तो खेळत आहे आणि क्रिकेटमध्ये अतिक्रमण करू पाहणाऱ्या बाह्य गुन्हेगारी घटकांविषयी तो अनभिज्ञ असावा. मात्र त्याच्या कृतीने त्याने भ्रष्टाचारासाठी दरवाजे उघडले आहेत.
वरिष्ठ खेळाडू आणि कर्णधार हे बुकींसाठी नेहमीच महत्त्वाचे असतात. कारण संघाबाबत त्यांच्याकडे जास्त उपयुक्त माहिती असते. त्यामुळे बुकी त्यांना लक्ष्य करतात. शाकीब याने कित्येक महिन्यांपर्यंत त्याच्यासोबत संभाषण सुरू ठेवले. त्यातून हे स्पष्ट होते की अशा प्रकारच्या कृत्यांमुळे होणाऱ्या शिक्षेबाबत खेळाडूंच्या मनात फारशी भीती नाही.
खेळांचे संरक्षक म्हणून ज्येष्ठ खेळाडू आणि कर्णधार महत्त्वाचे असतात. शाकीबने बुकी अग्रवालने केलेल्या संभाषणाबाबत अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक होते. तसे न केल्यामुळे तो थेट फिक्सिंगमध्ये जरी सहभागी नसला तरी भ्रष्टाचारासाठी दार उघडत होता. हॅन्सी क्रोनिएची घटना समोर आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंची मान खाली गेली होती. काही घटनांमध्ये भयानक परिणाम समोर आले आहेत. २०१३ च्या आयपीएल भ्रष्टाचारात काही खेळाडूंची कारकीर्द उतरणीला लागली. काही संघांवर बंदीही आली.
आयसीसीने ठरवलेल्या सर्व देशांमध्ये उपाययोजना करूनही मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग यासारखी प्रकरणे गेल्या दोन दशकात सातत्याने समोर येत आहेत. भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत विरोधी संस्थांना सातत्याने सतर्क रहावे लागते. भ्रष्टाचाराला खेळातून हद्दपार करण्यासाठी खेळाडूंनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.