कोलकाता : काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळताच २९ सामने झाल्यानंतर आयपीएलचे १४ वे पर्व मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. देशात कोरोनाचे थैमान असताना आयपीएलचे आयोजन कसे? अशी चौफेर टीका बीसीसीआयवर झाली. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.‘ आयपीएल आयोजन भारतात करून आम्ही कुठलीही चूक केलेली नाही,’ असे गांगुली यांनी सांगितले. आयपीएलसाठी आलेल्या विदेशी खेळाडूंची संपूर्ण काळजी बीसीसीआय घेत असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
आयपीएलचे उर्वरित ३१ सामने स्थगित झाले. हे सामने ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सुरू करण्याच्या पर्यायावर विचार सुरू असल्याची माहिती आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिल्यामुळे आयोजन, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंचे आरोग्य या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. सर्वच मुद्द्यांवर गांगुली यांनी उत्तरे दिली आहेत.
तेव्हा भारतात इतके रुग्ण नव्हते!आयोजनासंदर्भात बोलताना गांगुली म्हणाले,‘जेव्हा आम्ही आयपीएलचे आयोजन केले तेव्हा भारतात इतके रुग्ण नव्हते. आम्ही इंग्लंडचा दौरादेखील यशस्वीपणे पार पाडला. फेब्रुवारीत भारतात फार कमी रुग्णसंख्या होती. गेल्या तीन आठवड्यांत रुग्णसंख्या कैकपटींनी वाढली आहे. आम्ही आयपीएल गेल्या वर्षीप्रमाणे यूएईमध्ये आयोजनाच्या पर्यायावर विचार केला होता. पण शेवटी आम्ही भारतातच आयोजन केले. रुग्णसंख्या कमी होती म्हणूनच आम्ही दोन शहरांऐवजी सहा शहरांमध्ये सामने खेळविण्याचा निर्णय घेतला.’
बायोबबल कुचकामी ठरले?काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठा गाजावाजा झालेले बायोबबल कुचकामी ठरल्याची टीका होऊ लागली आहे. याविषयी गांगुली म्हणाले ‘ खेळाडूंनी बायोबबल नियमांचे उल्लंघन केले, असे मला वाटत नाही. हे नक्की कसे घडले हे सांगणे सध्या कठीण आहे. विदेशातील स्पर्धेदरम्यानही असे प्रकार झाले आहेत. भारतात कोरोनाबाधितांची संख्या का काढत आहे, याचे उत्तर नाही, तसेच आमच्याबाबत झाले आहे.’
विदेशी खेळाडू सुरक्षित
अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातल्यामुळे आयपीएलसाठी आलेल्या खेळाडूंचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, ‘‘सर्व परदेशी खेळाडू सुरक्षित असतील. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. ते सुरक्षितपणे घरी परततील. ऑस्ट्रेलियन खेळाडू मालदीवला पोहोचले. तेथे १० दिवस विलगीकरणानंतर ते ऑस्ट्रेलियाला जातील”, असे गांगुली म्हणाले.
आयपीएल पुन्हा कधी होणार?
n सध्या स्थगित झालेला हंगाम पुन्हा कधी सुरू होईल याविषयी आता काहीच सांगता येणार नसल्याचे गांगुलींनी स्पष्ट केले. शिवाय, हे सामने भारतात खेळविले जाणार की यूएईमध्ये हे देखील सध्या सांगणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.