- नीलेश देशपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. जेन्स ॲन्डरसनने त्याला अवघ्या सात धावात माघारी धाडले.यावर माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी भाष्य करीत विराटचा फॉर्ममध्ये परतण्यासाठी मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याचा सल्ला घेण्याची सूचना केली. कोहलीचे बालपणचे कोच राजकुमार शर्मा यांनी गावसकर यांच्या सूचनेला दुजोरा देत कोहलीने सचिनला सल्ला घेण्यास हरकत नाही, असे म्हटले आहे.
कोहली सध्या फॉमर्मध्ये नाही. तीन कसोटीच्या चार डावात त्याने केवळ ६९ धावा केल्या. बांगला देशविरुद्ध २०१९ ला शतकी खेळी केल्यापासून मागच्या ५० आंतरराष्ट्रीय खेळीमध्ये अद्याप तो शतकही झळकवू शकला नाही.दिल्ली संघाच्या वरिष्ठ संघाचे कोच असलेले शर्मा लोकमतशी बोलताना म्हणाले,‘सचिनसारख्या दिग्गजाकडून विराटने सल्ला घेणे गैर नाही.सचिनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अपार अनुभव असून विराट सचिनचा फार सन्मान करतो. सचिनहा कोहलीचा आदर्श आहे.रिराटने सचिनकडूनच नव्हे तर गावसकरांकडूनही मार्गदर्शन घ्यावे. विराटसारख्या खेळाडूला संकटातून बाहेर काढण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंनी पुढे यणे फारच लाभदायी ठरावे.’
विराट लवकरच मुसंडी मारेल,असा विश्वास व्यक्त करीत शर्मा म्हणाले,‘प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत बॅड पॅच येतो. विराटही त्याला अपवाद नाही. पण तो लवकरच फॉर्ममध्ये परत येईल,’ अशी खात्री आहे.’विराट हा मैदानावर आक्रमकतेसाठी ओळखला जातो. यावर शर्मा यांचे मत असे की आक्रमकतेमुळे काही सकारात्मक निकाल मिळाले.लॉर्ड्स कसोटीचा निकाल हा विराटच्या आक्रमकतेचाच विजय होता. विराटच्या आक्रमकतेचा परिणाम बघा, एकवेळ भारतीय संघ सर्वच प्रकारात नंबर वन बनू शकला.’
विराटने वेगवान गोलंदाजांना नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे भारताचा वेगवान मारा वर्चस्व गाजवतो आहे. काही वर्षांआधी विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असायची. आता मात्र गोलंदाज सामना जिंकून देऊ लागले.वेगवान गोलंदाज आता आणखी आक्रमक असून त्यांच्या कामगिरीतही सकारात्मकता आली. याचे श्रेय विराटला जाते. - राजकुमार शर्मा