आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा अखेर बीसीसीआयने मंगळवारी केली. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांची २८ एप्रिलला नवी दिल्ली येथे बैठक झाली. जवळपास २-३ तास ही बैठक झाली आणि त्यानंतर रोहित मुंबई इंडियन्सचा सामना खेळण्यासाठी लखनौला रवाना झाला. आगरकर आणि द्रविड हे दोघं मंगळवारी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेण्यासाठी अहमदाबाद येथे पोहोचले. तिघांमध्ये थोडक्यात बैठक झाली आणि त्यानंतर काही वेळातच भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जाहीर करण्यात आला.
विराट कोहलीची जागा पक्की झाली... रोहित शर्मासोबत यशस्वी जैस्वालचे सलामीला येण्याचे ठरले... हार्दिक पांड्याने संघातील जागा अन् उप कर्णधारपदही टीकवले... रिषभ पंतचे पुनरागमन, शिवम दुबेला संधी असे सर्व काही घडले. रिंकू सिंग हा दुर्दैवी ठरला, परंतु तो राखीव खेळाडू म्हणून संघासोबत अमेरिकेला जाणार आहे. जय शाह, आगरकर व द्रविड यांच्यात झालेल्या बैठकीत नेमके काय घडले?
हार्दिक पांड्या या बैठकीतील चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. त्याचवेळी संघात जागा नसल्याने रिंकू सिंगची निवड झाली नाही. रिंकून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत भारतासाठी मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली असतानाही त्याची निवड का नाही, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने रिंकूला न निवडल्याने संताप व्यक्त केला आहे. अजित आगरकरच्या निवड समितीने संजू सॅमसन व युझवेंद्र चहल यांना निवडण्यात जराही वेळ लावला नाही.
सूत्रांनी सांगितले की, रिंकू सिंग अनलकी म्हणावा लागेल... शिवम दुबे व रिंकू यांच्यात स्पर्धा होती आणि त्यात शिवम वरचढ ठरला. हार्दिकच्या नावावर बरीच चर्चा झाली, कारण त्याचा सध्याचा फॉर्म अन् कमकुवत नेतृत्व चिंतेचा विषय बनला आहे.
भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीचा संघ - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली. सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज; राखीव- शुबमन गिल, रिंकू सिंग, खलिल अहमद, आवेश खान