नवी दिल्ली : सिडनी कसोटीदरम्यान भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलिया संघासोबत लिफ्टमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. संघासाठी हा अपमान पचविणे फारच कठीण झाले होते,’ असा धक्कादायक खुलासा भारतीय संघाचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सोमवारी केला.
नुकत्याच संपलेल्या चार सामन्याच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी मैदानावर खेळविण्यात आला होता. दोन्ही संघ कोविडच्या सावटामुळे एकाच जैवसुरक्षा वातावरणात वास्तव्य करीत होते, हे विशेष. तो म्हणाला, ‘सिडनीत पोहोचल्यानंतर आम्हाला कठोर नियमासह बंद करण्यात आले. याच ठिकाणी एक अजब घटना घडली. दोन्ही संघातील खेळाडू बायोबबलमध्ये होते. पण जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये राहायचे तेव्हा भारतीय खेळाडूंना लिफ्टमध्ये जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. यामुळे खुप वाईट वाटले. आम्ही एकाच बायोबबलमध्ये होतो. तुम्ही एकाच लिफ्टमध्ये आम्हाला जाऊ देत नाही. जे खेळाडू एकाच सुरक्षित जैव वातावरणात आहेत. ही गोष्ट पचविणे फार अवघड होते, असे अश्विनने सांगितले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वर्णद्वेषी शेरेबाजीची घटना घडली. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना वर्षद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले होते. असाच एक अनुभव अश्विनने शेअर केला. हा खुलासा त्याने भारतीय संघाचे कोच आर श्रीधर यांच्यासोबत युूट्यूब चॅनलवरील चर्चेत केला.