मार्च २००१चा तो कसोटी सामना स्मरणात असेल. अविस्स्मरणीय कसोटींपैकी एक, त्या संस्मरणीय सामन्याला आज २० वर्षे झाली. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भागीदारीचा इतिहास रचला होता. दोघांनी आजच्याच दिवशी ऑसीविरुद्ध ३७६ धावांची भागीदारी केली होती....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी आम्ही बॅकफूटवर होतो. त्याआधी मुंबई कसोटीत तीन दिवसात हरवून स्टीव्ह वॉ च्या संघाने सलग १६ कसोटी सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली होती. कोलकाता येथे पहिल्या डावात हरभजनने भेदक मारा करीत कसोटी हॅट्ट्रिक घेतली, पण तरीही आम्ही फॉलोऑनच्या संकटात अडकलो. त्यानंतर जे घडले त्यावर बरेच लिहिण्यात आले....
विजय गोड असला तरी, यातून अनेक बोध घेता आले. सांगायचे झाल्यास कधीही हार मानू नका. कितीही अडथळे आले तरी समस्यांमध्ये न अडकता उपाय शोधा. स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या क्षमतेवर विश्वास बाळगा. काय घडले किंवा काय घडू शकते याची तमा न बाळगता सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लहान लहान लक्ष्य सेट करा आणि ते साध्य करण्यासाठी स्वत:वर रिफोकस करा. हे युद्धकौशल्य केवळ क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर दैनंदिन जीवनातही लागू होते. विजयाचे बरेच श्रेय भज्जी, द्रविड यांच्यासह मला देण्यात आले, मात्र माझ्यामते तो सांघिक विजय होता.
येथे उत्साह, उर्जा आहे...मागे वळून पाहतो तेव्हा ईडनवरील ते नाट्य डोळ्यापुढे येते. हे स्थान केवळ माझ्यासाठी नव्हे, तर भारतीय संघासाठी अनेक दशकांपासून विशेष स्थळ आहे. येथील खेळपट्टी उत्कृष्ट व स्पर्धात्मक आहे. येथील गर्दीत उत्साह व ऊर्जेचा संचार असतो. सचिन, गांगुली बाद झाल्यानंतरही आमची भागीदारी पाहण्यास गर्दी कायम होती.
झुंजार द्रविडतापाने फणफणलेल्या द्रविडने १८० धावा ठोकल्या. तो उपकर्णधार असताना मला तिसऱ्या स्थानावर संधी देत एकदाही त्याने नाराजी व्यक्त केली नाही. त्याने दाखविलेला निश्चय इतरांना प्रेरणादायी ठरला. संघाला संकटाबाहेर कसे काढायचे हे एकच लक्ष्य आम्हा सर्वांपुढे होते.