Join us  

कसोटीपटूंच्या वेतनात मोठी वाढ होणार! ‘रेड बॉल’ क्रिकेटला झुकते माप देण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार

आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडू ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळत नाहीत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 5:46 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘रेड बॉल’ क्रिकेटला प्रोत्साहन आणि झुकते माप देण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार आहे. कसोटी खेळणाऱ्यांच्या वेतनात लवकरच मोठी वाढ अपेक्षित आहे. सध्या एका कसोटीसाठी खेळाडूंना १५ लाख दिले जातात. आयपीएल २०२४ नंतर या रकमेत वाढ होईल.  आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडू ‘रेड बॉल’ क्रिकेट खेळत नाहीत.  

 ईशान किशनने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ईशानला रणजी सामने खेळण्याचा सल्ला दिला होता; पण ईशानने तो धुडकावून लावला.

दरम्यान, ईशान किशन ‘रेड बॉल’ क्रिकेटपेक्षा ‘आयपीएल’वर जास्त लक्ष केंद्रित करतो, असे वृत्तात म्हटले होते. श्रेयस अय्यर हादेखील पाठदुखीमुळे इंग्लंडविरुद्ध मालिकेतून बाहेर पडला. ‘एनसीए’ने मात्र श्रेयस  तंदुरुस्त असून, खेळण्यासाठी तयार आहे, असे स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही अय्यरने रणजी सामना खेळला नाही. ‘बीसीसीआय’च्या सूत्रानुसार, एखाद्या खेळाडूने कॅलेंडर वर्षात सर्व कसोटी मालिका खेळल्या तर त्याला वार्षिक रिटेनर कॉन्ट्रॅक्टव्यतिरिक्त बक्षीस दिले पाहिजे. खेळाडू अधिकाधिक रेड-बॉल क्रिकेटकडे वळतील आणि कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी लाभ होईल, हा यामागील हेतू आहे.

सध्या वनडेसाठी एका खेळाडूला सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख रुपये मिळतात. वेतनवाढीचा नवा ड्राफ्ट तयार आहे. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर बीसीसीआय करारबद्ध खेळाडूंना नव्या स्लॅबनुसार वेतन देणार आहे.

रोहित ॲन्ड कंपनीला मिळाला ब्रेक...रांची कसोटी चार दिवसांत संपविणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना ७ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळायचा आहे. दरम्यान, मंगळवारी भारतीय खेळाडू छोट्या ब्रेकवर आपापल्या घरी रवाना झाले. सर्व खेळाडू ३ मार्च रोजी धर्मशाला येथे एकत्र येणार आहेत.चार दिवसांचा ब्रेक मिळणे सर्व खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायी बाब म्हणावी लागेल. याआधी दुसऱ्या कसोटीनंतर खेळाडूंना जवळपास दहा दिवसांचा ब्रेक मिळाला होता. इंग्लंडचे खेळाडू या कालावधीत अबुधाबी येथे जाऊन आले. इंग्लंडचे खेळाडू सध्या चंडीगड येथे आहेत. ते पर्यटनाचा आनंद घेणार असून ४ मार्च रोजी धर्मशाला येथे दाखल होणार आहेत.

टॅग्स :बीसीसीआय