मेलबोर्न : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर मैदानावर अजिंक्य रहाणेने लावलेल्या क्षेत्ररक्षणामुळे प्रभावित झाले आहेत. मी त्याच्या नेतृत्वाची प्रशंसा करण्याची घाई करणार नाही कारण तसे केले तर मुंबईच्या खेळाडूचे समर्थन करीत असल्याचा आरोप होण्याची शक्यता आहे, असेही गावसकर म्हणाले. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेल्या रहाणेने गोलंदाजी आक्रमणाचा योग्य वापर केला. भारताने दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ७२.३ षटकांत १९५ धावांत गुंडाळला.
रहाणेच्या नेतृत्वाबाबत विचारले असता गावसकर म्हणाले,‘एवढ्या लवकर मी निष्कर्षापर्यंत पोहोचणार नाही. जर मी म्हटले की त्याचे नेतृत्व शानदार होते तर माझ्यावर मुंबईच्या खेळाडूंचे समर्थन करीत असल्याचा आरोप होईल. त्यामुळे मी त्यापासून दूर आहे. कारण सध्या ही सुरुवात आहे.’गावसकर रहाणेच्या क्षेत्ररक्षण लावण्याच्या पद्धतीमुळे प्रभावित झाले. कारण तीन ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ व ट्रॅव्हिस हेड यांचे झेल क्षेत्ररक्षकांनी टिपले.