अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -
बीसीसीआयचे जबाबदार पदाधिकारी असलेले अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धूमल आयपीएलचे आयोजन फसल्याची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. कोरोनाची दुसरी लाट इतकी थैमान घालेल हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील परिस्थितीवरून वाटत नव्हते, असे कारण दिले जात आहे. पण, हे तिघेही असा पळ काढू शकत नाहीत.
क्रिकेट प्रशासन हे व्हायरसचा आणि साथ रोगाचा अभ्यास करीत नाही हे मान्य, मात्र कोरोना त्सुनामीची चर्चा जगभरातील तज्ज्ञ जानेवारीपासूनच करीत होते. सरकार अस्वस्थ होत नाही तोपर्यंत आपणही हातावर हात ठेवून बसायचे काय? हा धोका किती गंभीर असेल याचा स्वतंत्रपणे वेध घेण्याचा शहाणपणा काय बीसीसीआयला नाही? आयपीएलचे आयोजन भारतात भरविण्याच्या संचालन समितीच्या निर्णयास अंतर्गत विरोध होताच, हे आता लपून राहिलेले नाही. यूएईत हे आयोजन व्हावे, अशा अनेकांनी सूचना केल्या, मात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
याआधीचे पर्व यूएईत निर्विघ्न पार पडले. तेथे प्रेक्षक नव्हते. येथेदेखील प्रेक्षकाविना सामने झाले. मग चूक नेमकी झाली कुठे? कोरोनाचा धोका नजरेआड करण्याचा मूर्खपणा कुणी केला? बीसीसीआयने गाफील राहून हा प्रश्न चिरडवला. मागच्या आठवड्यात २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या लीगधील बायोबबल फुटताच बीसीसीआयच्या अतिशहाणपणाचा फुगा अखेर फुटलाच!
आरोग्य सुरक्षेशी संबंधित प्रोटोकॉलचे झालेले उल्लंघन, खेळाडूंचे सरावादरम्यान खासगी क्लबच्या स्टाफमध्ये मिसळणे, बाहेरून मागविण्यात येणारे खाद्यपदार्थ, बुकींसाठी स्टेडियमच्या आत काम करणारे कर्मचारी या बाबीदेखील कुठे ना कुठे स्थगितीस कारणीभूत ठरल्या आहेत.
आता ३१ सामन्यांचे आयोजन करण्याची चिंता बीसीसीआयला भेडसावत असावी. त्यासाठी १५ ते २० दिवसांची विंडो लागेल. आंतरराष्ट्रीय व्यस्त वेळापत्रकामुळे ही बाब वाटते तितकी सोपी नाही.
दरम्यान, पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडकडे प्रस्थान करणार आहे. पाठोपाठ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळेल. अखेरचा सामना ६ सप्टेंबरला संपणार असून, १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन प्रस्तावित आहे.इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर आणि टी-२० विश्वकप स्पर्धेच्या सुरुवातीला आयपीएलच्या उर्वरित लढतींसाठी विंडो मिळणे शक्य आहे. पण, त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटी व ऑक्टोबरच्या सुरुवातीला पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटसाठी निश्चित असलेला दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा रद्द करण्याची वेळ येऊ शकते. बीसीसीआयचा उडालेला गोंधळ बघता दक्षिण आफ्रिका संघ भविष्यात यापेक्षा मोठा दौरा मिळण्याच्या आश्वासनावर ही मालिका रद्द करू शकते. पण, त्याचसोबत अन्य देशांचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध आहेत किंवा नाही, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. थकवण्यापेक्षा खेळाडूंना टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी फ्रेश ठेवण्यावर संघांचा भर असू शकतो. टी-२० विश्वकप स्पर्धेनंतर आयपीएलला सुरुवात करणे खेळाडूंवर अन्याय केल्यासारखे होईल. त्यावेळी कदाचित त्यांना वेगळे दौरे असतील.
त्रिकुटाने जबाबदारी झटकू नये -
- सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीतून बोध घेतला असावा. कोविडच्या परिस्थितीत प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यास सक्षम असल्याचे त्यांना सिद्ध करायचे आहे.
- भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रत्येकजण असे घडू नये यासाठी प्रार्थना करीत असले तरी शक्यता नाकारताही येत नाही. स्पर्धेचे आयोजन मायदेशात करण्यासाठी किंवा परिस्थिती आटोक्यात नसेल तर प्लॅन बी असणे आवश्यक आहे.
- आयपीएलमध्ये जे घडले तसे हवेत बाण न मारता प्रत्येक प्लॅन कृतीत उतरणे आवश्यक आहे. आयपीएल स्थगितीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करणे बोर्डसाठी मोठी बाब नाही, पण त्यापेक्षा विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला आहे.
Web Title: There will be financial compensation, but what about credibility
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.