- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमत
गेल्या वर्षभरात क्रिकेटविश्वावर भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले. विशेष करून विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी छाप पाडली. त्याचवेळी भारतीय क्रिकेटमधील काही युवा खेळाडूंनीही आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. त्यामुळेच यंदाच्या वर्षात भारताचे युवा शिलेदार कशा प्रकारे कामगिरी करतात याचीच उत्सुकता लागली आहे. यानिमित्ताने काही प्रमुख युवा खेळाडूंचा घेतलेला आढावा.
उदयोन्मुख फलंदाज
पृथ्वी शॉ : पृथ्वीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला स्वप्नवत सुरुवात झाली. पण यानंतर दुखापती झाल्याने त्याच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला आणि यानंतर काही वादग्रस्त गोष्टी घडल्याने त्याला संघाबाहेर बसावे लागले. शानदार खेळाडू असलेल्या पृथ्वीच्या भात्यात अनेक प्रकारचे फटके आहेत. पृथ्वीला आता मिळणारी प्रत्येक संधी उचलताना आपण उच्च दर्जावर दीर्घकाळ खेळू शकतो, हे सिद्ध करावे लागेल.
शुभमान गिल : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणजे शुभमान. त्याने उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर देशातील लक्षवेधी युवा फलंदाज असा मान मिळवला. पण पृथ्वीप्रमाणे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला स्वप्नवत सुरुवात झाली नाही. त्याला काही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत फारशी चमक दाखविता आली नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र त्याने संयत व आक्रमकतेचा योग्य ताळमेळ साधताना आपली छाप पाडली आहे.
उदयोन्मुख गोलंदाज -
भारताला दमदार फलंदाजांची देणगीच लाभली आहे. मात्र त्याचवेळी गेल्या काही वर्षांत देशात शानदार वेगवान गोलंदाजांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. भारतीय क्रिकेटमधील अनेक विजयांमध्ये वेगवान गोलंदाज निर्णायक ठरले. या नव्या गुणवत्तेमुळे आता एक प्रकारे बुमराह, शमी, उमेश आणि भुवनेश्वर या अव्वल गोलंदाजांपुढेही स्पर्धा निर्माण झाली आहे. या अव्वल पाच वेगवान गोलंदाजांनंतर भारताची दुसरी वेगवान फळीही त्याच ताकदीने उभी राहत आहे. यामध्ये दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांचे नाव आघाडीवर आहे. या चौघांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आणि यापैकी काही जण चमकलेही.
उदयोन्मुख फिरकीपटू
फिरकी गोलंदाजी कायमच भारताची ताकद राहिली आहे. आत्ताही भारताला फिरकीमध्ये नवी गुणवत्ता मिळाली. २० वर्षीय राहुल चहरने गेल्या वर्षी भारताच्या टी२० संघात स्थान मिळविले. त्याने आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. लेगस्पिन करताना राहुलने उत्तम कौशल्य दाखविताना जबरदस्त नियंत्रण राखत मारा केला.
उदयोन्मुख अष्टपैलू
अष्टपैलूंमध्ये शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी लक्ष वेधले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोघांनीही आपली उपयुक्तता सिद्ध केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही खेळाडूंनी सातत्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले.
उदयोन्मुख यष्टीरक्षक
गतवर्षात उशिराने, पण अखेर संजू सॅमसनची भारतीय संघात वर्णी लागली. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळेच नव्या वर्षात त्याच्यावर अधिक लक्ष असेल. आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करीत संजूने सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत. आक्रमक फटकेबाजीची क्षमता आणि शानदार यष्टीरक्षण कौशल्य, यामुळे संजू रिषभ पंतसाठी सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी ठरतो.
Web Title: There will be more focus on young players in the new year
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.