नवी दिल्ली : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटी सामन्यात जर अजिंक्य रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले तर त्याच्यावर कुठले दडपण राहणार नाही, असे मत महान फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. कोहली ॲडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांत रहाणेकडे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. स्टार स्पोर्ट्सच्या ‘गेम प्लॅान’ कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले, ‘अजिंक्यवर कुठलेही दडपण राहणार नाही. कारण त्याने दोन वेळा भारतीय संघाचे नेतृत्व केले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळविला होता आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही विजय मिळवला होता.’गावसकर पुढे म्हणाले, ‘कर्णधारपदाचा विचार केला तर कुठले दडपण राहणार नाही. कारण त्याला कल्पना आहे की पुढील तीन कसोटी सामने तो प्रभारी कर्णधारच राहणार आहे. त्यामुळे तो कर्णधारपदाबाबत अधिक विचार करीत असेल, असे मला वाटत नाही.’ रहाणेने दोन्ही सराव सामन्यात भारताचे नेतृत्व केले. हे दोन्ही सामने अनिर्णीत संपले. गावसकर म्हणाले, ‘आगामी २० दिवसांच्या क्रिकेटमध्ये त्याने १५ दिवस फलंदाजी करावी, असे मला वाटते. तो मानसिकदृष्ट्या एवढा सक्षम आहे की त्याच्यावर कशाचा परिणाम होत नाही. तो अन्य कुठल्या क्रिकेटमध्ये खेळत असो किंवा नसो, पण तो आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असतो.’ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडनने पुजाराची प्रशंसा करताना म्हटले, ‘चेतेश्वर पुजारा असा खेळाडू आहे ज्याचा कसोटी क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट ४५ च्या जवळपास आहे. ‘जशी तो फलंदाजी करतो तेवढ्याच प्रामाणिकपणे तो संघाचे नेतृत्व करेल. तो खेळपट्टीवर पुजाराला प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची संधी देईल आणि स्वत: त्याला साथ देईल.’ पुजारा २०१८-१९ मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत ५२१ धावा करीत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ ठरला होता. भारताने ती मालिका २-१ ने जिंकली होती. भारताला आगामी मालिकेत चांगली कामगिरी करायची असेल तर पुजाराला मोठ्या खेळी कराव्या लागतील.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रहाणेवर कर्णधारपदाचे कुठले दडपण राहणार नाही- सुनील गावसकर
रहाणेवर कर्णधारपदाचे कुठले दडपण राहणार नाही- सुनील गावसकर
कोहली ॲडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पितृत्व रजेवर मायदेशी परतणार आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यांत रहाणेकडे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 3:28 AM