Wasim Akram On Team India in Pakistan for Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. मिनी वर्ल्ड कप समजली जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तान जाणार की नाही, हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यासंदर्भात आता पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने मोठ वक्तव्य केले आहे. वसीम अक्रम या माजी पाक क्रिकेटरनं भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानात येऊन खेळण्यास राजी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारत सरकार अन् बीसीसीआय सकारात्मक; नेमकं काय म्हणाले वसीम अक्रम?
५८ वर्षीय माजी जलगती गोलंदाज म्हणाला आहे की, ''सध्याच्या घडीला जे काही माझ्या वाचनात येत आहे त्यानुसार, भारत सरकार आणि बीसीसीआय पाकिस्तानात खेळण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. मी असं कुठतरी असं वाचलंय की, ते (भारतीय संघ) सर्व सामने लाहोरमध्ये खेळण्यास पसंती देण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवशी ते इथं येतील आणि पुन्हा परत जातील. यासंदर्भात मला काहीच आक्षेप नाही. भारतीय संघासाठीही हा एक साधा सोपा मार्ग असेल."
भारतीय संघाच इथं जोरदार स्वागत होईल, असा शब्दही दिला
पाकिस्तानमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, भारतीय संघाच इथं जोरदार स्वागत होईल, असेही वसीम अक्रम यांनी म्हटलं आहे. वसीम आक्रम यांची ही गोष्ट खरी होणार का? हे येणारा काळच ठरवेल. कारण भारत सरकारची परवानगी मिळाल्याशिवाय बीसीसीआय यासंदर्भातील कोणताची निर्णय घेणार नाही, ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे.
भारतीय संघाला हवं तेच होणार; पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यासाठी अशी केलीये तयारी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनाचा प्लान आखला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आशिया कप स्पर्धेप्रमाणे हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता भारतीय संघानं सर्व सामने लाहोरच्या मैदानात खेळवण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे.
एवढेच नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डही यासाठी तयार आहे. जवळपास १७ हजार भारतीय चाहत्यांसाठी व्हिसा देण्याची तयारीही त्यांनी केली आहे. स्पर्धेतील फायनल लाहोरमध्ये आयोजित करण्यासह भारतीय संघ सेमीत पोहचला तर हा सामनाही याच मैदानात खेळवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.