भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याची पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. बीसीसीआयने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात रिषभ पंत व दिनेश कार्तिक या यष्टिरक्षकांची निवड झाली. फॉर्मात नसतानाही रिषभची निवड अन् सातत्यपूर्ण कामगिरीकरून संजूला डावलल्याने त्याचे चाहते प्रचंड संतापले आहेत. काही चाहत्यांनी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरुअनंतपुरम येथे २८ सप्टेंबरला होणाऱ्या लढतीत BCCI चा निषेध करण्याची योजना आखली आहे. संघातून वगळल्यानंतर संजूने अखेर बऱ्याच दिवसांनी त्याचं मत व्यक्त केलं. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ चर्चेला जात आहे.
भारतीय संघाकडून २०१५ मध्ये ट्वेंटी-२०त पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) ७ वर्षांत केवळ १६ सामने खेळण्याची संधी मिळाली. ७ वन डे सामन्यात त्याने ४४ च्या सरासरीने १७६ धावा केल्या आहेत. तो म्हणाला,''पाच वर्षांनंतर मी भारतीय संघात पुनरागमन केले, तेव्हाही भारतीय संघ जगातला नंबर १ संघ होता आणि आजही आहे. त्यामुळे नंबर १ संघात स्थान पटकावण्यासाठी स्पर्धाही आहे आणि तेवढे कौशल्य असलेले खेळाडू आपल्याकडे आहेत. त्यामुळे एकाला संधी मिळाली, तर दुसऱ्याची जातेच. पण, त्याचा फार विचार न करता सतत चांगलं खेळत राहण्याचा प्रयत्न करावा आणि संधीची वाट पाहावी. सकारात्मक विचार करावा.''
सोशल मीडियावरील चर्चांवरही त्याने मत व्यक्त केले. '' संजू लोकेश राहुलला रिप्लेस करणार, रिषभ पंतला रिप्लेस करणार, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात, परंतु मी याचा फार विचार करत नाही. लोकेश असो किंवा रिषभ हे दोघंही आपल्या टीमसाठीच खेळत आहेत. त्यामुळे सहकाऱ्यांशीच स्पर्धा करून मी माझ्या देशाचाच पराभव करतोय, असं होईल. त्यामुळे मी नेहमी सकारात्मक विचार करतो की आपली वेळ येईल तेव्हा १०० टक्के योगदान द्यायचे,''असे त्याने म्हटले.