नवी दिल्ली : अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत यजमान कांगारूच्या संघाने विश्वविजेत्या इंग्लंडला 3-0 ने पराभवाची धूळ चारली. मात्र मैदानावरील प्रेक्षकांची कमी होत असलेली संख्या आयोजकांच्या चिंतेत वाढ करणारी आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला होता. ऑस्ट्रेलियाने मंगळवारी डकवर्थ-लुईस पद्धतीने इंग्लंडचा 221 धावांनी पराभव केला. परंतु स्टेडियममधील प्रेक्षकांची क्षमता 90,000 पेक्षा जास्त असूनही मेलबर्न क्रिकेट मैदानावर केवळ 10,406 चाहते उपस्थित होते.
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या sendotcom.au च्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी यापूर्वीची सर्वात कमी प्रेक्षकसंख्या 1979 मध्ये 12,077 एवढी होती. अशातच ऑस्ट्रेलियन संघाचा माजी खेळाडू माईक हसीने या मालिकेकडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली याचे कारण सांगितले आहे.
सततच्या क्रिकेटमुळे प्रेक्षकांनी फिरवली पाठहसीने म्हटले, "हा सामना मंगळवारी रात्री होता, तेव्हा खूप थंडी होती. मेलबर्नमध्येही याचा परिणाम जाणवत होता. त्यांनी या मालिकेचे नियोजन टी-20 विश्वचषकानंतर आणि कसोटी सामन्यांच्या आधी केले होते. सध्या सतत क्रिकेट खेळवले जात आहे. जर तुम्ही खेळाडूंना विचारले तरी ते व्यस्त वेळापत्रकाबद्दल सांगतील. एकामागून एक स्पर्धा होत आहे." ऑस्ट्रेलियाचा संघ 30 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाने 3-0 ने एकदिवसीय मालिका जिंकली ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3 सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकून इंग्लिश संघाचा दारूण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्हीही डावातील 2-2 षटके कमी करण्यात आली होती. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड (152) आणि डेव्हिड वॉर्नर (106) या दोघांनी एकूण 269 धावा केल्या. कांगारूच्या संघाने निर्धारित 48 षटकांमध्ये एकूण 355 धावा केल्या होत्या. इंग्लिश संघाला आपले अस्तित्व राखण्यासाठी 48 षटकांत 356 धावांची आवश्यकता होती. मात्र इंग्लंडचा संघ 31.4 षटकांतच 142 धावांवर सर्वबाद झाला आणि कांगारूने मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तिन्ही सामने जिंकून विश्वविजेत्या इंग्लंडचा दारूण पराभव केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"