Rahul Dravid, IPL 2025: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या रोमहर्षक सामन्यात सात धावांनी विजय मिळवला आणि तब्बल १३ वर्षांनी विश्वचषक जिंकला. १५व्या षटकापर्यंत आफ्रिकेची सामन्यावर पकड होती, पण नंतर अचानक सामना फिरला. भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात भेदक मारा करत संघाला दुसरा T20 विश्वचषक जिंकून दिला. या विश्वचषकासोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळही संपला. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा त्याचा कार्यकाळ संपल्याने आता पुढे काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचबाबत आता अशी चर्चा रंगली आहे की, IPL मधील चार संघ राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यास उत्सुक आहेत.
भारत ज्या दिवशी वर्ल्डकप जिंकला, त्या दिवशी राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला. तेव्हाच तो गमतीत म्हणाला होता की मी आता बेरोजगार आहे. मला काही ऑफर्स असतील तर सांगा. पण आता खरोखरच त्याचा शोध लवकरच संपुष्टात येईल असे दिसते. इंडियन प्रीमियर लीगच्या चार फ्रँचायझी द्रविडचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यासाठी आणि त्याला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. हे चार आयपीएल संघ म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स (KKR), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR). IPL 2025च्या हंगामापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये सर्व संघांची पूर्णपणे पुनर्बांधणी केली जाईल.
या चार संघांपैकी द्रविडबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझी जास्त आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. याआधी तो RCBकडून खेळला आहे तसेच बंगळुरू हे द्रविडचे घर आहे. याशिवाय, दिल्ली संघाला संघ उभारणी मजबूत करण्यासाठी द्रविड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. रिकी पाँटिंग दिल्लीचे प्रशिक्षकपद सोडण्याची चर्चा आहे. तीच बाब KKRसाठीही लागू होते. गौतम गंभीर आता टीम इंडियाचा कोच होणार असल्याने त्याची जागी द्रविड घेऊ शकतो आणि KKRची विजयी लय कायम राखण्यात मदत करू शकतो असे सांगितले जात आहे. तर राजस्थान रॉयल्स या संघासाठी द्रविड स्वत: खेळला आहे तसेच या संघाचे त्याने प्रशिक्षकपदही भूषवले आहे. त्यामुळे या चार संघांमध्ये द्रविडला हेड कोच बनवण्यासाठी रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे.