आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अपेक्षेप्रमाणे विक्रमी बोलीचा नवा रेकॉर्ड सेट झाला. रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. एवढेच नाही तर अन्य ३ भारतीय खेळाडू मेगा लिलावात मालामाल झाले. यात श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यासारख्या मंडळींचाही समावेश आहे. या मंडळींची आयपीएलमधील कमाई आता विराट कोहलीपेक्षाही अधिक असणार आहे. जाणून घेऊयात आयपीएलच्या मेगा लिलावानंतर कोणते खेळाडू असे आहेत ज्यांना कोहलीपेक्षा अधिक पैसा मिळणार आहे त्यासंदर्भातील खास स्टोरी
रिषभ पंत - २७ कोटी
आयपीएलमधील पदार्पणापासून गत हंगामापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ताफ्यात असणारा रिषभ पंत लिलावात मालामाल झाला. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने त्याच्यासाठी २७ कोटी बोली लावली. विराट कोहलीपेक्षा त्याची कमाई ६ कोटींनी अधिक आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलेल्या लिलावात या मोठ्या बोलीसह पंत IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
श्रेयस अय्यर - २६ कोटी ७५ लाख
प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरवर मोठा डाव खेळला. यंदाच्या लिलावातील सर्वात मोठी बोली आधी त्याच्यावर लागली होती. पण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम त्याच्या नावे फक्त काही मिनिटेच राहिला. पंतचं नाव आलं अन् तो मागे पडला. श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीपेक्षा त्याची कमाई पाच कोटींपेक्षा अधिक आहे.
व्यंकटेश अय्यर - २३ कोटी ७५ लाख
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने व्यंकटेश अय्यरला मोठं सरप्राइज दिलं. त्याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी शाहरुखचट्या संघानं २३ कोटी ७५ लाख रुपये मोजले. तो यंदाच्या लिलावातील तिसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. तोही आता विराट कोहलीपेक्षा २ कोटींनी अधिक कमाई करणार आहे.
हेन्रिक क्लासेन - २३ कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने मेगा लिलावाआधी विराट कोहलीला २१ कोटी रुपयांसह रिटेन केले होते. तीन भारतीय खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन हा देखील आयपीएलमध्ये कोहलीपेक्षा अधिक पॅकेज मिळवणारा खेळाडू आहे. मेगा लिलावाआधी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने या खेळाडूला २३ कोटींसह रिटेन केले होते.