- ललित झांबरे
दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार डेन व्हॅन निकर्क आणि तिची सहकारी मरिझान कॅप यांनी मंगळवार, १२ नोव्हेंबरला इतिहास घडवला. आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या स्पर्धेत एकाच वेळी फलंदाजी करणारे हे पहिलेच जोडपे ठरले. त्यांनी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ६७ धावांची भागिदारी करून दक्षिण आफ्रिेकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
त्याच्याबद्दल ‘जोडपे’ या शब्दाने आश्चर्य वाटले असेल ना, पण हे खरे आहे. डेन व्हॅन व मरिझान यांनी लग्न केले असून हे रितसर जोडपे आहे. दक्षिण आफ्रिकन संघातील या सहकारी यंदा जुलैमध्ये विवाहबद्ध झाल्या. एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने त्यांनी आपल्या प्रेमाला नात्यात रूपांतरीत करण्याचा निर्णय घेतला आणि ७ जुलै २०१८ रोजी त्यांनी लग्न केले.
असे असले तरी महिला क्रिकेटमधील हे काही पहिले जोडपे नाही. त्यांच्याआधी न्यूझीलंडच्या अॅमी सॅटर्थवेट आणि ली ताहूहू या गेल्यावर्षी मार्चमध्ये विवाहबद्ध झाल्या होत्या. या दोन्हीसुद्धा २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या संघात आहेत मात्र आयसीसीच्या स्पर्धेत एकाचवेळी सोबत फलंदाजी करणारे पहिले जोडपे ठरण्याचा मान मात्र डेन व्हॅन व मरिझान या जोडप्याला मिळाला. डेन व्हॅन व मरिझान यांनी २००९ च्या विश्वचषक स्पर्धेवेळी दोन दिवसाच्या अंतरात पदार्पण साजरे केले. तेंव्हापासूृन डेन व्हॅन ९८ वन डे आणि ७० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने तर कॅप ९६ वन डे आणि ६७ टी-२० सामने खेळली आहे.
महिला क्रिकेटमधील पहिले जोडपे असलेल्या न्यूझीलंडच्या अॅमी अॅमी सॅटर्थवेट आणि ली ताहूहू यांनी २०१४ मध्ये विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतल्यावर प्रत्यक्षात मार्च २०१७ मध्ये लग्न केले. त्यांच्यात चार वर्षांनी लहान असलेल्या जलद गोलंदाज ली हिने अॅमीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. या जोडप्यातील सॅथर्थवेट ही २०१७ ची आयसीसी प्लेयर आॅफ दी इयरसुद्धा होती. २०१६-१७ च्या मोसमात तिने वन डे सामन्यांमध्ये लागोपाठ चार शतके करण्याचा विक्रम केला आहे तर ली ताहूहू ही महिला क्रिकेटमधील सर्वात जलद गोलंदाजांमध्ये गणली जाते.