नवी दिल्ली, दि. 11 - जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड म्हणून बीसीसीआयची क्रिकेट जगात ओळख आहे. आयसीसीला मिळणाऱ्या वार्षिक मानधनात बीसीसीआयचा वाटा 80 टक्के आहे. आयसीसीकडून बीसीसीआयलाही मोठं मानधन मिळतं. बीसीसीआय म्हणजेच कुबेराचा खजिना आहे, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. कारण अनेक भारतीय क्रिकेटपटू करोडपती आहेत. इतर देशांच्या तुलनेत त्यांचे वार्षिक मानधनही भरमसाट आहे. अ दर्जातील खेळाडूंना बीसीसीआय दोन कोटी रुपये देतं तर ब दर्जाच्य़ा खेळाडूंना एक कोटीच वार्षिक मानधन दिलं जात. याशिवाय जाहिरात, कंपन्यासोबत करार अशा अनेक गोष्टीतून त्यांची रग्गड कमाई होत असते. आज आपण भारताच्या दहा श्रीमंत खेळाडूंची माहिती जाणून घेणार आहोत. स्पोर्ट्स कीडाच्या वृत्तानुसार सध्या संघात असलेले, निवृत्त झालेले आणि संघाबाहेर असणाऱ्या सर्वच खेळाडूंचा उल्लेख करण्यात आला आहे.
सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली. त्याला आपण दादा म्हणूनही ओळखतो. सध्या दादा कोलकाता क्रिकेट बोर्डाच्या संचालकपदाच काम पाहत आहे. दादाची संपत्ती ही अंदाजे 99 कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहिरातींमधून सौरवला अंदाजे 7 कोटी रुपये मिळतात. सौरवची खासगी मालमत्ता ही अंदाजे 45 कोटींच्या घरात आहे. याव्यतिरिक्त सौरव गांगुलीकडे अटलॅडीको डी कोलकाता या फुटबॉल संघाची मालकी आहे.
नवव्या स्थानावर भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर आहे. गंभीरची संपत्ती अंदाजे 101 कोटी रुपये आहे. त्याला बोर्डाकडून वर्षाला 10 कोटींच मानधन मिळते. तर जाहिरातीच्या माध्यमातून तो 5 कोटींची कमाई करतो. त्याची खासगी मालमत्ता ही अंदाजे 85 कोटींच्या घरात आहे.
आठव्या स्थानावर आहे मुंबईकर रोहित शर्मा. अंदाजे त्याची संपत्ती 124.5 कोटी आहे. बीसीसीआय आणि आयपीएलच्या माध्यमातून रोहितला वर्षाकाठी 11.5 कोटींचे मानधन मिळते. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून 7.5 कोटी कमवतो. मुंबईतील वरळी सी-लिंक जवळ असणाऱ्या अलिशान घराची किंमत 30 कोटीं आहे.
सातव्या स्थानावर आहे धाकड फलंदाज युवराज सिंग. अंदाजे त्याची संपत्ती 146 कोटींच्या आहे. आयपीएलमधून 7 कोटी आणि जाहिरातीच्या माध्यमातून वर्षाकाठी तो 7.5 कोटींची कमाई करतो. याव्यतिरिक्त युवराज सिंहचं चंदीगडला स्वतःचं घर आहे, ज्याची किंमत अंदाजे 45 कोटींच्या घरात आहे.
सहाव्या स्थानावर आहे मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना. त्याची संपत्ती अंदाजे 150 कोटींच्या घरात आहे. आयपीएल आणि जाहिरातीच्या माध्यमातून रैनाला वर्षाला 16.5 कोटींची कमाई होते. याव्यतिरिक्त देशभरात रैनाच्या विविध शहरात प्रॉपर्टी आहेत, ज्याची किंमत 27 कोटींच्या घरात आहे.
पाचव्या स्थानावर युसूफ पठाण. वाचून आश्चर्यचकीत झालात ना? पण हे खरं आहे. दिर्घकाळ भारतीय संघात नसला तरी कमाईच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आहे. अंदाजे त्याची संपत्ती दोन कोटी 65 लाखांच्या घरात आहे.
चौथ्या क्रमांकावर आहे भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग. मुलतान का सुलतान असलेल्या सेहवागची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी आहे. बीसीसीआयकडून मिळणारा पगार, आयपीएलची कंत्राटं यामधून सेहवागला मोठी रक्कम मिळते. याव्यतिरिक्त हरियाणात सेहवाग स्वतःची शाळा आणि क्रिकेट अकादमी चालवतो.
तिसऱ्या स्थानावर आहे कर्णधार विराट कोहली. 2017 च्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत सर्वाधीक मानधन मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत कोहलीचा समावेश होता. त्याची संपत्ती अंदाजे 390 कोटी इतकी आहे. आयपीएलमधून विराट कोहलीला 14 कोटी रुपये मिळतात. याव्यतिरिक्त मुंबई आणि दिल्लीत कोहलीचं स्वतःचं घर आहेत. कोहलीची खासगी संपत्ती ही जवळपास 42 कोटींच्या घरात आहे.
या यादीत माजी कर्णधार एम.एस. धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची अंदाजे संपत्ती 734 कोटींच्या घरात आहेत. आयपीएलमधून गेल्या दोन वर्षात धोनीने 30 कोटींची कमाई केली आहे. याव्यतिरीक्त धोनीला आलिशान बाईकची आवड आहे. धोनीकडे सध्या 25 कोटींच्या किंमतीच्या आलिशान बाईक आहेत. धोनीची खासगी संपत्ती ही 522 कोटींच्या घरात आहे. याव्यतिरिक्त धोनी चेन्नईयन एफ.सी. संघाचा मालक आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनची संपत्ती ही अंदाजे 1006 कोटींच्या घरात आहे. बीसीसीआय आणि जाहीरातींच्या माध्यमातून सचिनला वर्षाकाठी 17 कोटींची रक्कम मिळते. याव्यतिरिक्त सचिनकडे आता 24 ब्रँडच्या जाहिरातींचं कंत्राट आहे.
Web Title: These are ten Indian rich cricketer, will be stunned to read the fifth largest number
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.