सिडनी - बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत जोरदार कमबॅक केले होते. मात्र आत्मविश्वासाने भारलेला भारतीय संघ तिसऱ्या कसोटीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंना बायो बबलचे नियम मोडल्याने आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यातच आता रोहित शर्मा आणि अन्य खेळाडूंनी हॉटेलमध्ये बीफ खाल्ल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील एका बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नुकताच एका ट्विटर युझरने एका रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी गेलेल्या भारतीय संघातील रोहित शर्मा, रिषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी यांचे बिल आपण भरल्याचा दावा केला होता. तसेच यादरम्यान, रिषभ पंत याची गळाभेट घेतल्याचाही उल्लेख केला होता. मात्र नंतर असे घडले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र हा वाद निवळला नसतानाच भारतीय खेळाडूंच्या खाण्याच्या बिलाचा एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे बीफच्या बिलाची रक्कमही जोडण्यात आली आहे. मात्र बीफची रक्कम बिलामध्ये चुकून जोडण्यात आली आहे की हे बिल अन्य कुणाचे आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.हा फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्वीटरवर रोहित शर्मा आणि बीफचे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आहे. यादरम्यान काही लोकांनी रोहित शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांवर टीका केली. तर काहीजणांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.दरम्यान, मेलबोर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोना जैवसुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सर्वांना पुढील चौकशीपर्यंत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.बिल भरणाऱ्या चाहत्याला द्यावे लागले स्पष्टीकरणपंतने चाहत्याला मिठी मारल्याची बातमी मिळाली होती; पण नंतर त्या चाहत्याने असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करीत आहेत. या प्रकरणात कोरोनासंदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का, याचा तपास केला जात आहे. प्राथमिक उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया आणि भारतीय वैद्यकीय समितीच्या सल्ल्यानुसार या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रवासाच्या वेळी किंवा सराव करताना या पाच खेळाडूंना इतर खेळाडूंपासून वेगळे ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.