मुंबई : एबी डी’ व्हिलियर्सने क्रिकेटला अलविदा करत साऱ्यांनाच धक्का दिला आहे. एक हरहुन्नरी क्रिकेटपटू म्हणून डी’ व्हिलियर्स हा सर्वांना परिचीत आहेच. पण क्रिकेटमध्ये त्याने अशा काही गोष्टी केल्या आहेत, ज्या तुम्हाला माहितीही नसतील. अशा काही गोष्टी करणारा तो क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू असेल.
डी’ व्हिलियर्स म्हणजे एक तुफानंच होता. फलंदाजीला आल्यावर सर्वच गोलंदाजांना धडकी भरायची. गोलंदाजांचा कर्दनकाळ, ही उपमा त्याला शोभणारी अशीच. डी’ व्हिलियर्स धडाकेबाज फलंदाजी करत असला तरी त्याने कसोटी क्रिकेटमध्येही आपला कमीच असा ठसा उमटवला होता. त्याचबरोबर एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणूनही त्याला लौकिक होता.
आतापर्यंत त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतके लगावली आहेत. त्याचबरोबर या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याने बळीही मिळवले आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या प्रकारात त्याने झेल तर घेतलेच आहेत, पण त्याचबरोबर त्याने बऱ्याच फलंदाजांना यष्टीचीतही केले आहे. त्यामुळे डी’ व्हिलियर्ससारखी अष्टपैलू कामगिरी ही कोणत्या क्रिकेटपटूकडून घडली असे तरी वाटत नाही. फक्त ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये त्याला शतक झळकावता आले नाही आणि विश्वविजयी संघाचा कधी भाग होता आले नाही, या गोष्टीची सल त्यालाही असेल.