भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्या नावाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका अॅपची ही जाहीरात असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. पण, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला असल्याचे सचिनने स्वतः ट्विट करून सांगितले आहे. त्याने या अॅप विरोधात तक्रार करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांत ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत आणि त्यात ५१ शतकं व ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. ४६३ वन डे सामन्यांत त्याने ४९ शतकं व ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. नाबाद २०० ही त्याची वन डेतील, तर नाबाद २४८ ही कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.
''हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा,''असे सचिनने ट्विट केले आहे.
तो पुढे म्हणतो,'' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि बातम्यांना आळा बसावा आणि डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे.''