कोलकाता : शहर बदलले, सीएसकेचे प्रतिस्पर्धी बदलले, पण महेंद्रसिंग धोनीचा सूर मात्र बदलला नाही. २३ एप्रिलच्या संध्याकाळी, कोलकात्यात निवृत्तीसंदर्भात जे बोलला, तेच २१ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये बोलला होता. ‘ईडन गार्डन्सच्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार. ते सर्वजण मला निरोप द्यायला आले होते.’… हे शब्द होते महेंद्रसिंग धोनीचे आयपीएलच्या १६व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतरचे.
ऐतिहासिक ईडनचे मैदान स्थानिक संघ कोलकाता आणि महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा देण्यासाठी खचाखच भरले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने या मैदानावर सर्वांत मोठी टी-२० धावसंख्या म्हणजेच २३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ आठ गडी गमावून १८८ धावांवर गडगडला आणि विजयापासून ४९ धावा दूर राहिला.
सामना संपल्यानंतर मैदानावर पोहोचलेले चाहते पुरस्कार सोहळ्यात धोनीचा आवाज ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबले. माहीने चाहत्यांचे आभार मानले आणि हातवारे करत सांगितले की, ‘आता एक खेळाडू म्हणून तो या मैदानावर पुढचा सामना खेळू शकणार नाही अर्थात त्याची आयपीएल निवृत्ती लवकरच होणार आहे. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वीच अनेक दिग्गजांना विश्वास होता की धोनीची ही शेवटची आयपीएल असेल. आता खुद्द धोनीनेही हे त्याचे शेवटचेच सत्र असल्याचे मान्य केले. धोनी म्हणाला, ‘कोलकाताचे प्रेक्षक मला फेअरवेल देण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याबद्दल त्यांचे आभार.’ या दरम्यान धोनीने मैदान कर्मचाऱ्यांसोबत फोटोदेखील काढले.
चाहत्यांना इतक्या मोठ्या संख्येने सीएसकेच्या जर्सीमध्ये पाहून धोनी भावुक झाला. ‘पुढच्यावेळी यामधील अनेकजण केकेआरची जर्सी परिधान करून येतील. ते मला निरोप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो,’ असे एमएस म्हणाला. ४१ वर्षांचा धोनी २०२० मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.