Rohit Sharma heart touching story: क्रिकेटपटूंचे जीवन जितके ग्लॅमरस असते तितकेच धकाधकीचेही असते. क्रिकेटपटूंना दौऱ्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करावाच लागतो. कित्येकदा दुसऱ्या देशात क्रिकेटपटूंना महिने-दोन महिनेही राहावे लागते. अशा वेळी त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकवेळी सोबत ठेवणे शक्य नसते. बरेचदा क्रिकेटपटूंना त्यांच्या आयुष्यातील काही अनोख्या क्षणांना मुकावे लागते आणि तसे क्षण पुन्हा कधीही मिळत नाहीत. असाच एक प्रसंग सांगताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा थोडासा भावनिक झाल्याचे दिसून आले. क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये रोहितने त्याच्या आयुष्यातील हातून निसटून गेलेल्या क्षणाबद्दल सांगितले.
रोहितने सांगितला 'तो' क्षण
रोहित पॉडकास्टमध्ये दिलखुलासपणे बोलला. तो म्हणाला, मी २०१८ साली पहिल्यांदा बाबा बनणार होतो. त्यावेळी भारतीय संघ मेलबर्न येथे टेस्ट खेळत होता. टेस्ट खेळून झाल्यानंतर आपल्या पहिल्या मुलीच्या जन्मासाठी तो भारतात परतणार होता. पण असं काही घडलं की त्याला वेळेत भारतात येता आलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआयने त्याला सुट्टी मान्य करूनही ऑस्ट्रेलियामुळे त्याला त्याच्या आयुष्यातील हा क्षण अनुभवता आला नाही.
त्यावेळी नक्की असं काय घडलं?
टेस्ट मालिकेतील त्या सामन्यात भारत अतिशय मजबूत स्थितीत होता. भारताला विजयासाठी केवळ दोनच विकेट्सची आवश्यकता होती, पण त्याचवेळी पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या दोघांनी डावाच्या शेवटी १०० धावांची भागीदारी केली. हा सामना भारताने जिंकला असला तरी या सामन्याचा निकाल लागण्यासाठी भरपूर उशीर झाला. पॅट कमिन्स आणि नॅथन लायन या दोघांनी मला वेळेवर जाऊ दिलं नाही. त्यामुळे सामना जिंकूनही रोहित फारच निराश होता. त्याला विमान पकडायला उशीर झाला. त्यामुळे तो वेळेवर कुटुंबाकडे पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे त्याला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी आपल्या पत्नीसोबत राहता आले नाही, याची त्याला खंत वाटते असे त्याने सांगितले.