हातातोंडाशी आलेला विजय लांबवायचा कसा, हे विराट कोहलीच्या आरसीबीकडून शिकायला हवे. गचाळ क्षेत्ररक्षण आणि डेथ ओव्हरमधील दिशाहीन गोलंदाजीमुळे या संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना सुपर ओव्हरपर्यंत कसा पोहोचवला, याचे मजेदार वर्णन करताना माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने संघाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले.
‘वीरू की बैठक’ या कार्यक्रमात सेहवाग म्हणाला, ‘एकवेळ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या आरसीबीच्या गोलंदाजांनी अखेरच्या चार षटकात ८० धावा अक्षरश: बहाल केल्या.‘जिंदगी में अगर इंटरटेनमेंट चाहिए तो किसी चीज पर भरोसा करो या न करो लेकिन आरसीबीकी ‘डेथ बॉलिंग’ पर भरोसा जरूर करो,’असा उपहासात्मक टोला लगावून वीरूने हा संघ जिंकलेला सामना सुपरओव्हरपर्यंत कसा पोहोचवितो, याचेही मजेदार वर्णन केले. तो म्हणाला,‘ चिकूचा (विराट) संघ अखेर जिंकला, तोदेखील गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध.’
दोन्ही संघांनी निर्धारित षटकात प्रत्येकी २०१ धावा केल्याने सोमवारचा सामना ‘टाय’ झाला होता. विराटच्या संघाने मुंबईला आधीपासून अडचणीत आणल्यामुळे आरसीबी जिंकेल, असे १६ व्या षटकापर्यंत वाटत होते. डेथ ओव्हरमध्ये टाकलेले चेंडू बचाव करणारे नव्हते. क्षेत्ररक्षणदेखील सुमार दर्जाचे होते.