ढाका - मोठ्या विवाह सोहळ्यांमध्ये चोरट्यांकडून हात साफ करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, लग्नसोहळ्यातील या चोरट्यांच्या विघ्नाचा फटका एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला बसला आहे. शाही थाटात झालेल्या या क्रिकेटपटूच्या विवाहसोहळ्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चोरट्यांनी लग्नातील वऱ्हाडी मंडळींचे मोबाईल चोरले. एवढेच नाही तर पकडले गेल्यावर या चोरांनी चक्क क्रि्केटपटूच्या नातेवाईकांनाच मारहाण केली.
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू सौम्या सरकार नुकताच विवाहबद्ध झाला. सौम्या सरकारने खुलना येथील रहिवासी प्रियोन्ती देबनाथ हिच्याशी विवाह केला. सौम्या आणि प्रियोन्तीच्या शाही विवाह सोहळ्यात क्रिकेटपटूंसोबत अनेक व्हीआयपी मंडळी सहभागी झाली होती. मात्र याच विवाह सोहळ्यात काही चोरटेही घुसले होते. त्यांनी काही वऱ्हाडी मंडळींच्या मोबाईलवर हात साफ केला. त्यानंतर या चोरांनी सौम्या सरकारच्या एका नातेवाईकाला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सौम्या सरकारने विवाहासाठी काही काळ क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्याची पत्नी प्रियोन्ती हिने ढाका येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून ओ स्तराची परीक्षा पास केली आहे. विवाहामुळे सौम्या सरकार झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सहभागी झाला नव्हता. सौम्या सरकराने आतापर्यंत १५ कसोटी, ५५ एकदिवसीय आणि ४८ टी-२० ,सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.