मुंबई : आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माकडे भारताचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने एकही सामना न गमावता थेट अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रोहितच्या कर्णधारपदाची चर्चा चांगलीच रंगत आहे. त्यामुळे जर आता विराट कोहलीला कर्णधारपद मिळवायचे असेल तर त्याला 'ही' गोष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.
इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताचा चांगली कामगिरी करता आली नव्हती. भारताला एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कसोटी मालिकेतही इंग्लंडने भारताला 4-1 अशी धूळ चारली होती. या दौऱ्यानंतर कोहलीने विश्रांती घेण्याचे ठरवले आणि आशिया चषकासाठी रोहितची कर्णधारपदी वर्णी लागली.
आशिया चषकानंतर आता भारतीय संघाला वेस्ट इंडिजशी दोन हात करावे लागणार आहेत. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी कोहली इच्छूक आहे, पण कोहलीला आता सहजासहजी संघात स्थान मिळवता येणार नाही.
भारतीय संघाने खेळाडूंसाठी एक नियमावली बनवली आहे. या नियमावलीनुसार जो खेळाडू संघाबाहेर जाईल, त्याला आपण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध करावे लागेल. विराट कर्णधार असला तरीही त्याला हा नियम लागू पडतो. त्यानुसार कोहलीला संघात परतायचे असेल आणि कर्णधारपद भूषवायचे असेल तर त्याला आता यो-यो टेस्ट देणे अनिर्वाय आहे. 28 सप्टेंबरला त्याची ही चाचणी होणार आहे. या चाचणी पास झाल्यावरच कोहलीला संघात स्थान मिळू शकते.