नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर सुरू असलेल्या विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली. शेजाऱ्यांना सलामीच्या सामन्यात भारताकडून तर दुसऱ्या सामन्यात नवख्या झिम्बाब्वेकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पाकिस्तानने नेदरलॅंड्सचा पराभव करून स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. पाकिस्तानच्या संघाची निराशाजनक खेळी पाहून पाकिस्तानी चाहत्यांसह देशातील माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमवर टीका करत आहेत. बाबर सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. भारताविरुद्धच्या सलामीच्या लढतीत तो गोल्डन डकवर बाद झाला होता, तर झिम्बाब्वेविरुद्ध त्याला 9 चेंडूत 4 धावा करता आल्या.
गौतम गंभीरची टीकानेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने पाच चेंडूत केवळ 4 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याला स्वार्थी म्हटले आणि त्याने आधी स्वत:चा नव्हे तर संघाचा विचार करायला हवा असा सल्ला दिला आहे. बाबर आझमच्या कर्णधारपदावर टीका करताना गंभीरने कॉमेंट्री करताना म्हटले, "माझ्या मते सर्व प्रथम स्वतःपेक्षा तुमच्या संघाचा विचार करायला हवा. जर तुमच्या योजनेनुसार काही घडत नसेल, तर तुम्ही फखर झमानला सलामीसाठी पाठवायला हवे होते. याला स्वार्थी म्हणतात, स्वार्थी असणे सोपे आहे. कर्णधार बाबर आणि मोहम्मद रिझवानसाठी पाकिस्तानच्या डावाची सुरूवात करून अनेक विक्रम करणे सोपे आहे. जर तुम्हाला लीडर व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या संघाचा अधिक विचार करावा लागेल."
अख्तर, अक्रमनेही साधला निशाणा गौतम गंभीरशिवाय इतरही माजी खेळाडूंनी बाबर आझमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचा देखील समावेश आहे. शोएब अख्तर, वसीम अक्रम यांनी देखील बाबरवर निशाणा साधला होता. याशिवाय बाबर आझमने मधल्या फळीत येऊन फलंदाजी करावी असेही त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानचा आगामी सामना गुरूवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. खरं तर पाकिस्तानचा संघ जवळपास विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यांना आता इतर संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"