ठळक मुद्देधोनीचा नाद करायचा नाय, आयसीसीचा सल्लाट्विटर हँडलवर धोनचाच फोटो
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बॅटीतून धावांचा ओघ आटला असला तरी यष्टिमागील त्याच्या चपळतेला अजूनही तोड नाही. वाऱ्यापेक्षाही जलद त्याच्या स्टम्पिंग करण्याचा वेग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC ) यांनाही धोनीनं आपल्या कौशल्यानं प्रेमात पाडलं. त्यामुळेच आयसीसीच्या ट्विटर हॅंडलवर धोनीचा फोटोच त्यांनी लावला. सतत धोनीचं गुणगान ते गात आहेत आणि त्यात भर म्हणून आयसीने धोनीसाठी चक्क काव्यपंक्तीची रांगच लावली. प्रसिद्ध गायक आणि गीतकार जॉन लेनोनन्स यांच्या ' Imagine' या गाण्यांतील पंक्तीचा आधार घेत धोनीशिवाय क्रिकेटविश्व कस असेल हे आयसीसीने पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
धोनीचा खेळ संथ झालाय, अशी बोंब मारणाऱ्यांना माहीनं कामगिरीतून चोख उत्तर दिले. न्यूझीलंड दौऱ्यातही याची प्रचिती आली. संघ अडचणीत असताना सहकाऱ्यांना वेळोवेळी त्याने केलेले मार्गदर्शन किती उपयुक्त ठरले, याबाबत वेगळे सांगायला नको. तिशीपल्ल्याड धोनी यष्टिमागे अजूनही तितक्याच अचुकपणे व वेगाने भूमिका पार पाडत आहे. त्यामुळेच आयसीसीनेही धोनीचा नाद करायचा नाय, असा सल्ला दिला आहे. आयसीसीचा हा ट्विट चांगलाच व्हायरल झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, न्यूझीलंडच्या टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो यांनी जोरदार फटकेबाजी करताना रोहितचा निर्णय चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने 7.4 षटकांत 80 धावांची सलामी दिली आणि त्यांची ही भागीदारी फिरकीपटू कुलदीप यादवने संपुष्टात आणली. पण, त्याला विकेट मिळवून देण्यात धोनीचा मोलाचा वाटा होता. धोनीने सेकंदाच्या 0.099 इतक्या जलद वेगाने ही स्टम्पिंग करून किवींना पहिला धक्का दिला. आयसीसीनं त्यानंतर पुन्हा एक ट्विट केलं, परंतु यावेळी त्यांनी जॉन लेनॉनच्या 'Imagine' या गाण्यातील ओळीच पोस्ट केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि याही मालिकेत कॅप्टन कूल धोनी कांगारूंचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत धोनीला विश्वविक्रम नोंदवून दक्षिण आफ्रिकेच्या मार्क बाऊचरला मागे टाकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने खेळल्यात धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा यष्टिरक्षक म्हणून धोनीच्या नावे विक्रम नोंदवला जाणार आहे. बाऊचरच्या नावावर 596 आंतरराष्ट्रीय सामने आहेत, तर धोनी ( 594) दोन सामन्यांच्या पिछाडीने दुसऱ्या स्थानावर आहे. या विक्रमात श्रीलंकेचा कुमार संगकारा ( 499) आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट ( 485) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.