अहमदाबाद : सलग दोन एकदिवसीय सामने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेला भारतीय संघ शुक्रवारी रंगणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या सामनाही जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देण्याच्या निर्धाराने खेळेल. महत्त्वाचे म्हणजे, अनुभवी सलामीवीर शिखर धवन कोरोनातून सावरला असून त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्याच्या समावेशाने भारतीय फलंदाजीला अधिक बळकटी मिळेल.
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर अखेरच्या सामन्यात धवन खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. धवनसह एकूण चार खेळाडू एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. धवनच्या पुनरागमनानंतर संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल होईल. त्याच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या सामन्यात इशान किशन, तर दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने रोहितसोबत डावाची सुरुवात केली होती. धवन सलामीला खेळणार हे निश्चित असल्याने उपकर्णधार लोकेश राहुल पुन्हा मधल्या फळीत खेळेल.
दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना केवळ २३७ धावाच काढता आल्या. मात्र गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत विंडीजच्या हातातून सामना हिसकावून आणला. त्यात आता धवनच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाची ताकद आणखी वाढली आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले स्थान भक्कम केले. तसेच अंतिम संघासाठी उपलब्ध झालेल्या श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळणार का, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
गोलंदाजांच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. दुखापतीतून सावरलेला कुलदीप यादव पुनरागमनासाठी उत्सुक आहे. त्याला किंवा युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. वेगवान गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी स्वत:ला सिद्ध केले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि आवेश खान.
वेस्टइंडीज : किएरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ॲलेन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शामार ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अलजारी जोसफ, ब्रेंडन किंग, निकोलस पुरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वाल्श जुनियर.
Web Title: Third ODI against West Indies today, Shikhar Dhawan will play
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.