कराची : ‘पाकिस्तान क्रिकेट दूरस्थपणे चालविण्यासाठी मिकी आर्थर यांची प्रशिक्षक-संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांची निष्ठा पाकिस्तान क्रिकेटच्या तुलनेत त्यांच्या काउंटी संघासाठी अधिक आहे. त्यामुळे ही नियुक्ती वेड्यांच्या गावातील सर्कसच्या जोकरसारखी आहे,’ अशी हेटाळणी पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी आर्थर यांची नियुक्ती झाल्यानंतर केली.
रमीज यांनी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी आणि व्यवस्थापन समितीलाही चपराक लगावली. प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी रमीज यांच्या जागी सेठी यांची पीसीबी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
‘पीसीबी अध्यक्षांना क्रिकेटची कोणतीही समज नाही. स्वत: खेळाडू असताना क्लब सामन्यासाठी संघात जागा मिळविण्यासही ते सक्षम नसतील. राजकीयदृष्ट्या प्रेरित असलेले लोक पाकिस्तान क्रिकेट चालवत आहेत आणि याच कामासाठी त्यांना १२ लाख रुपये महिना वेतन मिळत आहे,’ असेही राजा म्हणाले.
पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने समितीतील सदस्यांना मोठे मासिक वेतन मिळत असल्याचा राजा यांचा दावा फेटाळून लावला. ‘व्यवस्थापन समिती सदस्यांना सेवा नियमानुसार भत्ता आणि दैनिक वेतन मिळते. शहराबाहेर राहणाऱ्या सदस्यांना निवासाची सुविधा प्रदान केली जाते,’ असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.सेठी म्हणाले, ‘रमीज मंडळाकडून निवृत्तिवेतन घेत आहेत. त्यामुळे आचारसंहितेनुसार त्यांना अधिकाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही.’