ICC ODI World Cup 2023 : आशिया चषक सुरू असताना आर अश्विन हा त्याची कुट्टी स्टोरी करण्यात व्यग्र होता... तेव्हा त्यानेही विचार केला नसेल की त्याला अचानक वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात बोलावणं येईल. आशिया चषक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला, तेव्हाही वॉशिंग्टन सुंदरला बोलावले गेले. आशिया चषकाची फायनलही सुंदरने खेळली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत अश्विनला बोलावले गेले, कारण अक्षरच्या दुखापतीबाबात स्पष्टता नव्हती. पण, अखेर अक्षरच्या माघारीचे अपडेट्स आले अन् अश्विनचा समावेश केला गेला. आज तो गुवाहाटी येथे सराव सामन्यात खेळणार आहे आणि त्याआधी त्याने मोठे विधान केले आहे.
भारतीय संघ २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवा खेळाडूंसह उतरेल हे पक्कं आहे आणि अशा परिस्थितीत अश्विनला पुन्हा संधी मिळणं अवघड आहे. हे त्यानेही मान्य केले आहे आणि म्हणून हा कदाचित माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल असे तो म्हणाला.
“मी म्हणालो असतो की तू गंमत करत आहेस. आयुष्य आश्चर्यांनी भरलेले आहे. खरं सांगायचं तर वाटलं नव्हतं मी इथे येईन. परिस्थितीने मी आज येथे असल्याची खात्री केली आहे. संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. या टूर्नामेंटमध्ये दबावाचा सामना करणे हे सर्वोपरी आहे आणि ते स्पर्धेत कामगिरी कशी होते हे ठरवेल. या स्पर्धेचा आनंद घेतल्याने मला चांगली कामगिरी करता येईल. भारतासाठी हा माझा शेवटचा विश्वचषक असू शकतो, त्यामुळे स्पर्धेचा आनंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे रविचंद्रन अश्विनने दिनेश कार्तिकला सामन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भारतीय क्रिकेट संघ दोन सराव सामन्यांनी WC तयारीच्या अंतिम फेरीला सुरुवात करतो. नेदरलँड्सच्या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमला जाण्यापूर्वी ते गुवाहाटीमध्ये इंग्लंडशी सामना करणार आहेत, परंतु तिथे सध्या पाऊस पडतोय. रोहित शर्मा अँड कंपनी ८ ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करेल. अश्विनने गेल्या सहा वर्षांत फक्त पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत. तरीही, अक्षर पटेल जखमीसह त्याला वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले आहे. ३७ वर्षीय अश्विन २०२५च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपर्यंत केवळ कसोटीवर लक्ष केंद्रित करेल.