मोहाली : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील टी-२० मालिकेला २० सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून सुरूवात होत आहे. आशिया चषकानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित सेना विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. आजचा सामना मोहाली येथे होणार असून सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरूवात होईल. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमहारचे मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो आशिया चषक खेळू शकला नव्हता.
दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अक्षर पटेल आणि दीपक हुडा यामधील कोणाला आजच्या सामन्यासाठी स्थान मिळते हे पाहण्याजोगे असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी पॉवर हिटर म्हणून ओळखला जाणाऱ्या टीम डेव्हिडवर बरेच लक्ष असेल, जो सिंगापूरसाठी क्रिकेट खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑस्ट्रेलियन संघात पदार्पण करणार आहे.
बुमराह आणि हर्षलचे पुनरागमनदुखापतीमुळे भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया चषकातून बाहेर झाला होता. कमकुवत गोलंदाजीमुळे भारतीय संघाला आशिया चषकात उल्लेखणीय कामगिरी करता आली नव्हती. परंतु, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारताकडे पूर्ण ताकदीचे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे सामने २० सप्टेंबर- मोहाली २३ सप्टेंबर - नागपूर २५ सप्टेंबर- हैदराबाद
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हनभारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलिया - आरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, पॅट कमिंन्स, जोश हेझलवुड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा.