मेलबोर्न : विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवायला मिळणे, हा मोठा सन्मान असतो. असा सन्मान १५ वर्षांच्या कारकिर्दीत मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार असल्याने मी उत्साहित झालो आहे. माझ्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले आहे.
२००७ मध्ये टी-२० क्रिकेटचा पहिला विश्वचषक झाला तेव्हा २० वर्षीय रोहित भारतीय संघात होता. दिनेश कार्तिक आणि रोहितव्यतिरिक्त २००७ चा विश्वचषक खेळलेला एकही फलंदाज भारतीय संघात नाही. तसेच १५ वर्षांनंतर रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणार असल्याने ही मोठी उपलब्धीच म्हणावी लागेल. रोहित पुढे म्हणाला, ऑस्ट्रेलियात येऊन ताजेतवाने वाटते आहे. इथल्या खेळपट्ट्या उत्कृष्ट दर्जाच्या असतात.