...ही तर आचरेकर सरांच्या कपड्यांना पोचपावती : दिनेश लाड

Dinesh Lad: ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेटचे धडे गिरवले, ते माझे गुरू रमाकांत आचरेकर सर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ठरले होते आणि आज माझीही त्याच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही सरांसाठी गुरुदक्षिणा ठरली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:18 PM2022-11-15T12:18:06+5:302022-11-15T12:20:07+5:30

whatsapp join usJoin us
...This is an acknowledgment of Achrekar sir's clothes : Dinesh Lad | ...ही तर आचरेकर सरांच्या कपड्यांना पोचपावती : दिनेश लाड

...ही तर आचरेकर सरांच्या कपड्यांना पोचपावती : दिनेश लाड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- रोहित नाईक
मुंबई : ‘ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेटचे धडे गिरवले, ते माझे गुरू रमाकांत आचरेकर सर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ठरले होते आणि आज माझीही त्याच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही सरांसाठी गुरुदक्षिणा ठरली आहे. मी त्यांचे कपडे परिधान करून खेळलोय आणि आज त्यांच्या या कपड्यांना पोचपावती मिळाली आहे,’ अशा शब्दांत द्रोणाचार्य जीवनगौरव विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. 

भारताचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांच्यासह अनेक क्रिकेटपटू घडविणारे लाड यांना सोमवारी राष्ट्रीय द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘माझ्या गुरूंना ३२ वर्षांपूर्वी जो पुरस्कार मिळाला, तोच पुरस्कार आता मी त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकारणार आहे. असा दुर्मीळ आनंद त्यांचा विद्यार्थी म्हणून मी आज अनुभवत आहे. हा पुरस्कार आचरेकर सरांच्या वापरलेल्या कपड्यांची पोचपावती आहे. मी सरांकडे क्रिकेट शिकत असताना आर्थिक परिस्थितीमुळे माझ्याकडे क्रिकेटचे कपडे विकत घ्यायचेही पैसे नव्हते. तेव्हा सरांनी अनेकदा मला त्यांचे कपडे दिले होते. त्यांचे कपडे परिधान करून खेळल्याचा खूप अभिमान आहे आणि त्यांना गुरुदक्षिणा देण्यात मी यशस्वी ठरलो, असे मानतो.’

पुरस्कारामध्ये विद्यार्थ्यांचाही वाटा! 
     लाड यांनी पुढे सांगितले की, ‘या पुरस्कारामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचाही मोठा वाटा आहे. ते मोठ्या स्तरावर यशस्वी झाल्याने मला हा गौरव प्राप्त झाला.’ 
     ‘या पुरस्कारासाठी माझी शिफारस झाल्याचे कळले तेव्हा आनंद झालाच होता; पण रोहित आणि शार्दुल यांनी शिफारस केल्याचे कौतुक अधिक होते,’ असेही लाड म्हणाले. 
     ‘आता अधिकाधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडविण्याचे माझे स्वप्न असून, यासाठी मला बोरिवली-कांदिवली परिसरात जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. सरकारकडून मदत मिळण्याची खूप अपेक्षा आहे,’ असे लाड यांनी सांगितले.

पत्नीचे मोलाचे योगदान!
माझी पत्नी दिपाली हिच्या त्यागाशिवाय हा पुरस्कार अपूर्ण आहे. मी पूर्ण वेळ क्रिकेटसाठी दिला आणि तिने घराकडे, मुलांकडे लक्ष दिले. शिवाय अनेक मुलांना मी माझ्या घरी राहायला ठेवले असताना तिच्याकडून कधीही विरोध झाला नाही. आमचा मुलगा सिद्धेश याच्याप्रमाणेच या मुलांचाही दीपालीने सांभाळ करत त्यांच्याकडे लक्ष दिले. या मुलांना घरी राहण्यास ठेवताना दिपालीने कधीही कोणतीही शंका उपस्थित केली नाही. तिच्या पाठिंब्यामुळेच क्रिकेटविश्वातील हिरे घडविता आले. त्यामुळेच माझ्यापेक्षा दिपालीचे योगदान खूप मोठे आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
- दिनेश लाड, क्रिकेट प्रशिक्षक

Web Title: ...This is an acknowledgment of Achrekar sir's clothes : Dinesh Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.