पोत्चेफस्ट्रूम : ‘मी जेव्हा युवा विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेत आली होती, तेव्हा सारे लक्ष्य केवळ १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यावर होते. आम्ही हे विजेतेपद मिळवले असून, आता सर्व लक्ष आगामी महिला टी-२० विश्वचषक जेतेपदावर लागले आहे. त्यामुळे या विजेतेपदाच्या आठवणी मागे ठेवून आता मला वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया १९ वर्षांखालील भारताच्या मुलींच्या संघाची कर्णधार शेफाली वर्मा हिने व्यक्त केली.
१० फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेतच महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. याच देशात भारताच्या मुलींनी शेफालीच्या नेतृत्वात पहिलावहिला १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक पटकावला. १९ वर्षीय शेफालीचा वरिष्ठ भारतीय संघातही समावेश आहे. त्यामुळे ती आता दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा स्वप्नवत बनविण्यासाठी सज्ज झाली आहे. २०२० मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळीही शेफालीचा भारताच्या संघात समावेश होता.
शेफाली म्हणाली की, ‘मेलबर्नमध्ये खेळला गेलेला तो अंतिम सामना माझ्यासाठी खूप भावनिक ठरला होता. तो सामना आम्हाला जिंकता आला नव्हता. जेव्हा मी १९ वर्षांखालील संघात आली, तेव्हा केवळ विश्वविजेतेपदाचा विचार केला होता. मी मुलींना नेहमी केवळ आपल्याला जिंकायचेच आहे, असे सांगत असे आणि आम्ही जिंकलोय. विश्वचषक अंतिम सामना गमावल्यानंतर आम्ही खूप रडलो होतो; पण, आता हे आनंदाश्रू आहेत. आम्ही जे जिंकण्यास आलो होतो, ते जिंकलोय.’
‘भारतासाठी धावा काढत राहणार’
१९ वर्षांखालील विश्वचषक पुरस्कार सोहळ्यात शेफालीला अश्रू अनावर झाले होते. ती म्हणाली की, ‘मी अश्रू रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले; पण, मला हे अश्रू रोखता आले नाहीत. मी भविष्यातही दमदार कामगिरी करत भारतासाठी धावा काढत राहणार; पण आता केवळ या विश्वचषकावर समाधान मानणार नाही. ही तर आता केवळ सुरुवात झाली आहे.’
Web Title: 'This is just the beginning! Now the focus is on Women's T20 World Cup', Shefali Verma's statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.