अयाज मेमन
घरच्या मैदानावर भारतीय संघ नेहमीच विजयाचा दावेदार असतो. त्याला नागपूर कसोटीही अपवाद नव्हती. मात्र, ऑस्ट्रेलिया इतक्या लवकर नांगी टाकेल याचा विचारही केला नव्हता. पहिल्या डावात १७७ आणि दुसऱ्या डावात ९१ या धावा ऑस्ट्रेलियन संघाच्या लौकिकाला साजेशा नक्कीच नाहीत. त्यामुळे एक डाव आणि १३२ धावांनी झालेल्या पराभवाला नुसता पराभव म्हणता येणार नाही तर याला शरणागती म्हणतात. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ भारतापुढे इतका हतबल झालेला मी कधीही पाहिला नव्हता.
नाणेफेक जिंकल्यानंतर असे वाटले होते की ऑस्ट्रेलिया सामन्यात मोठी आघाडी मिळवेल. कारण, भारतीय खेळपट्ट्यांवर चौथ्या डावात फलंदाजी करणे कुठल्याच संघाला सोपे नसते. फिरकीसाठी अनुकूल असलेली नागपूरची खेळपट्टी रोहितच्या संघालाही चौथ्या डावात चांगलीच कठीण गेली असती. ऑस्ट्रेलियन संघाला फक्त एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे पहिल्या डावात ३२५ वर धावा. कारण, यामुळे भारतीय संघ दबावात आला असता; पण ज्या गोष्टी आदर्शपणे सांगितल्या जातात त्या अंगीकारायला सहसा कठीण असतात. कांगारूंचेही नेमके हेच झाले. तसेच रेनशॉ आणि हँड्सकॉम्बच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाने स्वत:साठी खड्डा खोदून घेतला. चुकीच्या संघनिवडीला साथ मिळाली ती फलंदाजांच्या अवसानघातकी फलंदाजीची (स्मिथ, लाबूशेन वगळता), सुमार गोलंदाजीची आणि महत्त्वाचे म्हणजे ढिसाळ क्षेत्ररक्षणाची. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची हीच प्रमुख कारणे होती. १९५९ ला ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू रिची बेनो यांनी सर्वाधिक २९ बळी घेतले होते. जसू पटेल यांनी १९६९ साली घेतलेल्या बळींपेक्षा ते जास्तच होते. त्यानंतर पुढच्याच दौऱ्यात ॲश्ले मालेटने २८ बळी घेतले. तर भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना २६ बळीच घेऊ शकले. अलीकडेच २०१७ साली जडेजाने सर्वाधिक २५ बळी घेतले होते. मात्र, स्टीव्ह ओकॅफी आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी १९ बळी घेतले होते. नागपुरातील खेळपट्टी नक्कीच फिरकीला अनुकूल होती; पण ती अजिबात फलंदाजीच करता येणार नाही, अशी पण नव्हती. मर्फीने सात बळी घेऊनही भारतीय संघ ४०० धावा करण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आधीच हाराकिरी पत्करली होती. अनेक फलंदाजांनी अतिशय खराब फटके खेळले आणि ते बाद झाले. ऑस्ट्रेलियन संघाने जर हीच वृत्ती कायम ठेवली तर पॅट कमिन्सच्या संघासाठी उर्वरित मालिका चांगलीच आव्हानात्मक ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने कुठे चूक केली? त्यांच्या अवसानघातकी फलंदाजीची कारणे काय? असे असंख्य प्रश्न निर्माण होता. तर त्याला काही कारणे आहेत. पहिले म्हणजे संघनिवड करताना ऑस्ट्रेलियाने केलेली गल्लत. गेल्या १० ते १२ कसोटी सामन्यांपासून भन्नाट फॉर्मात असलेल्या ट्रॅविस हेडला वगळणे ऑस्ट्रेलियन संघाला भोवले. केवळ डावखुरा फलंदाज आहे म्हणून हेडला वगळणे हा ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनाचा मूर्खपणा होता.
(लेखक लोकमतमध्ये कन्सलटींग एडिटर आहेत)