Asia Cup 2023 - बीसीसीआयने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी तीन फिरकीपटूंची निवड करताना युझवेंद्र चहल व आर अश्विन यांना बाहेर बसवले. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव असे तीन फिरकी गोलंदाज आशिया चषकाच्या संघात आहेत. भारताला ८ व ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारे गोलंदाज हवे असल्याने अक्षरची निवड केल्याचे सांगण्यात आले. पण, आर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडेही ती क्षमता आहे. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे दुखापतीतून सावरून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत.
संजू सॅमसनची वन डे क्रिकेटमधील सरासरी चांगली असूनही तिलक यादव व सूर्यकुमार यांची निवड सर्वांना आश्चर्यचकीत करणारी ठरतेय. संजूची या संघात राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड झालेली आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघावर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आर अश्विनला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान का मिळाले नाही, या चर्चेवर गावस्करांचा पारा चढला. त्यांनी अश्विनला वगळण्यावरून वाद घालणाऱ्या चाहत्यांचे कान टोचले आहेत.
ते म्हणाले,''या संघात असे काही खेळाडू आहेत, की अनेकांना ते लकी वाटू शकतात, परंतु त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे आता अश्विनच्या मुद्यावर चर्चा करण्यास काहीच अर्थ नाही. त्यामुळे वाद उकरून काहीच अर्थ नाही. हा आता आपला संघ आहे. तुम्हाला जर संघ आवडला नसेल, तर सामने पाहू नका, परंतु हा खेळाडू संघात हवा होता किंवा हा नको हवा होता, हे बोलणं थांबवा.''
कोणत्याही खेळाडूने आपल्यावर अन्याय झालाय असे म्हटलेले नाही, असे बोलून गावस्करांनी चहल, सॅमसन यांच्यावरून सुरू झालेल्या वादालाही पूर्णविराम दिला. ते म्हणाले, हा संघ वर्ल्ड कप जिंकू शकतो. कोणत्याच संघाने त्याच्यावर अन्याय झाल्याचे म्हटलेले नाही. अनुभवी अन् फॉर्मात असलेले खेळाडू आशिया चषक स्पर्धेसाठीच्या १७ सदस्यांमध्ये निवडले गेले आहेत.
गावस्करांनी यावेळी लोकेश राहुलच्या निवडीला पाठींबा दिला आहे.