Join us  

...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्या व जेतेपदाच्या मार्गात पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 2:50 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्या व जेतेपदाच्या मार्गात पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. भारतीय संघाने हा वर्ल्ड कप उंचावण्यासाठी कोणत्याच चुकीला थारा दिलेला नाही. फलंदाज, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या सर्व आघाड्यांवर टीम इंडिया अव्वल राहिली आहे. या वर्ल्ड कपमधील एकमेव अपराजित संघ हा भारतच आहे.. त्यात रोहित शर्माा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांची फटकेबाजी आणि मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यावद, रवींद्र जडेजा यांची गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाचा पार पालापाचोळा करतेय.. भारताने या वर्ल्ड कपमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. ४८ वर्षांच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात जे कधीही घडलं नव्हतं ते यावेळी भारताच्या त्रिकुटाकडून घडलं आहे.

विराट कोहलीने २०२३चा वर्ल्ड कप गाजवला आहे आणि आतापर्यंत एकाही फलंदाजाला न जमलेला विक्रम त्याने नोंदवला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात ७०० हून अधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. १० सामन्यांत त्याने १०१.५७च्या सरासरीने ७११ धावा केल्या आहेत, त्यात ३ शतकांचा ( बांगलादेश, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड) समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माने वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाला अग्रस्थानी ठेवले आणि आक्रमक सुरुवात करून देताना सहकाऱ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला. रोहितने १० सामन्यांत ५५च्या सरासरीने ५५०  धावा कुटल्या आहेत. श्रेयस अय्यरनेही चौथ्या स्थानासाठीची त्याची निवड सार्थ ठरवली आणि ७५.१४च्या सरासरीने ५२६ धावा केल्या आहेत. लोकेश राहुल ( ३८६) व शुबमन गिल ( ३४६) यांचीही बॅट चांगली तळपली आहे. 

गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचा नाद न केलेलाच बरा... उशीरा संधी मिळूनही शमीने या स्पर्धेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह ( १८), रवींद्र जडेजा ( १६), कुलदीप यादव ( १५) व मोहम्मद सिराज ( १३) यांनीही हा वर्ल्ड कप गाजवला आहे. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा जडेजा हा भारताचा फिरकीपटू ठरला आहे. पण, शमीने वर्ल्ड कपमध्ये एकूण ५१ विकेट्स घेऊन मोठा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला आणि सर्वात कमी १७ सामन्यांत त्याने हा पराक्रम करून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासात भारताच्या तीन फलंदाजांनी एकाच पर्वात ५०० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय.

  • विराट कोहली - ७११
  • रोहित शर्मा - ५५०
  • श्रेयस अय्यर - ५२६  

भारताकडून एकाच पर्वात मधल्या फळीत सर्वाधिक धावांचा विक्रमही श्रेयस अय्यरने नावावर केला. लोकेश राहुलने याच वर्ल्ड कपमध्ये  ३८६ धावा केल्या आहेत आणि २०११ मध्ये युवराज सिंगने ३६२ धावा केल्या होत्या.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्माश्रेयस अय्यर