Chennai Super Kings has lost 4 consecutive matches - गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने आज पराभवाचा चौकार पूर्ण केला. सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट्स व १४ चेंडू राखून आयपीएल २०२२मधील त्यांच्या पहिल्या विजयाची नोंद केली. चेन्नईने विजयासाठी ठेवलेले १५५ धावांचे लक्ष्य SRHने सहज पार केले. अभिषेक शर्माने ७५ धावांची दमदार खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने झटपट नाबाद ३९ धावा करत सनरायजर्स हैदराबाद संघाला पहिला विजय मिळवून दिला
प्रथम फलंदाजी करताना रॉबिन उथप्पा १५ तर ऋतुराज गायकवाड १६ धावांवर बाद झाले. मोईन अली ( ४८) आणि अंबाती रायुडूने ( २७) अर्धशतकी भागीदारी करून चेन्नईचा डाव सावरला. कर्णधार रविंद्र जाडेजाने २३ धावांची भर घातल्याने चेन्नईला १५४ धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात SRHच्या अभिषेक शर्माने ५० चेंडूत ७५ धावा करत IPL कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक झळकावलं. केन विल्यमसन सोबत त्याने ८९ धावांची सलामी दिली. विल्यमसन ३२ धावांवर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १५ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.
आयपीएल इतिहासात कर्णधार म्हणून पहिले चारही सामने गमावणारा रवींद्र जडेजा हा पहिला भारतीय आणि एकूण दुसरा खेळाडू ठरला. २०१३मध्ये आरोन फिंचकडे पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे नेतृत्व होते आणि त्याने चारही सामने गमावले होते. चेन्नईने दुसऱ्यांदा सलग चार सामने गमावण्याचा नकोसा पराक्रम केला आहे. पण, हा नकोसा विक्रम नोंदवूनही त्यांनी २०१०मध्ये पहिले जेतेपद पटकावले होते. त्यामुळे CSKच्या फॅन्सना हताश होण्याचं कारण नाही.
२१ मार्च ते २८ मार्च २०१० या कालावधीत CSK ने सलग चार सामने गमावले होते. त्यांनी पंजाब किंग्स ( सुपर ओव्हर), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ३६ धावांनी), मुंबई इंडियन्स ( ५ विकेट्सने ) आणि राजस्थान रॉयल्स ( १७ धावांनी) यांच्याविरुद्ध हे सामने गमावले होते. त्याच पर्वात त्यांनी पहिले आयपीएल जेतेपदही पटकावले होते.